धुळे : (प्रतिनिधी) । महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे एमडी असल्याचे भासवित धुळ्यातील इले. फर्म मालकास तब्बल 13 लाखात गंडा घालणार्या तिघांना अखेर गुजरात राज्यातील सुरतमधून जेरबंद करण्यात केले. सायबर पोलिसांच्या पथकाने चार महिने अथक प्रयत्न करीत ही कामगिरी बजावली. यशवंत काशिनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई व विजय शिवहरी शिरसाठ अशी तिघा संशयीत आरोपींची नावे आहेत. तिघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अशी केली होती फसवणूक- धुळे शहरातील जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेस या नावाने इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील (रा.धुळे) यांना दि.13 सप्टेबर 2014 रोजी विज वितरण कंपनीच्या धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र विज वितरण कंपीनीचे एमडी लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे त्यांचा फोन घेणे असा कॉल आला. त्यानंतर काही वेळात पाटील यांच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. त्यांनी मै लोकेश चंद्रा बोल रहा हु, एमएसईडीसीएल के डायरेक्टर मिटींग मे बिझी हु, मेरे अंकल सुरत के हॉस्पीटल में अॅडमिट हैं, उनका ऑपरेशन होना हैं, तो आप मुझे 8 लाख रुपये अर्जेट भेज दिजीए, मै आपके पैसे आज शाम तक लौटा दूंगा असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी तत्काळ खातेधारकाच्या खात्यावर नेट बँकिंगद्वारे आरटीजीएसने 8 लाख रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोन आला व अंकलच्या उपचारासाठी आणखी 5 लाख रुपये पाठविण्याची विनंती केली. यावेळी त्या इसमाने दहिसर मुंबई येथील खाते नंबर दिले. त्यावर पाटील यांनी आरटीजीएसद्वारे 5 लाख रुपये पाठविले.
चंद्रांशी बोलल्यानंतर अज्ञातांनी फसविल्याचे आले लक्षात- पैसे पाठविल्यानंतर सायंकाळी जिजाबराव पाटील यांनी आरोपीच्या दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला असता, त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडुन श्री.चंद्रा यांचा नंबर घेवून संपर्क केला असता, श्री.चंद्रा यांनी कोणतीही पैशाची मागणी केली असल्याचे नाकारले. त्यानंतर फिर्यादी पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. त्यांच्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर गुन्हेगार सामान्य जनतेतुन काही लोकांना 8 ते 10 हजार रुपयांचे अमिष दाखवून बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी डिपॉझिट रक्कम देतात व खाते उघडल्यानंतर त्या खात्याचे एटीएम त्या खात्याला लिंक असलेले मोबाईल सिमकार्ड त्याच्याकडुन घेतात व त्या खात्यावर सायबरद्वारे केलेल्या रक्कमेचा व्यवहार करतात. अशा प्रकारे खातेदार मोठया प्रमाणार सायबर आरोपी होत आहेत. त्यामुळे कोणीही आपले स्वतःचे नावाचे सिमकार्ड, स्वतःच्या नावाचे बँक खात्याची माहिती व एटीएम कार्ड दुसर्या व्यक्तीस देवू नये. अन्यथा तुम्ही सुद्धा आरोपी होवू शकतात, असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
या पथकाची कामगिरी- गुन्हा दाखल होताच सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तपासाला गती दिली. चार महिने अथक प्रयत्न करीत वरील तिन जणांना सुरत येथून अटक केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घुसर, तपासाधिकारी पोसई प्रतिक कोळी, जगदीश खैरनार, पोहेकॉ खलाणेकर, राजु मोरे, मराठे, पोकाँ तुषार पोतदार यांच्या पथकाने केली.