Monday, October 14, 2024
Homeजळगावउन्नत ग्रामसाठी ११२ गावांची निवड

उन्नत ग्रामसाठी ११२ गावांची निवड

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगाव : प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ११२ गावात राबविली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.त्यातून पक्के घर, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, सौर ऊर्जा, आयुष्मान कार्डसह विविध योजना या गावात राबविल्या जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,अतिक्रमणधारकांना उतारे देण्यात वर्धा जिल्ह्यानंतर जळगावचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. जळगावच्या प्रशासनाने अतिक्रमधारकांना उतार्‍यासह ८ नंबरचा दाखला देण्यातही आघाडी घेतली आहे. उन्नत योजनेत रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ, जामनेर, जळगाव, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीतील निष्कर्षाच्या आधारे या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार आहेत.
भाविकांची पहिली रेल्वे जळगावातून निघणार
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून भाविकांची राज्यातून पहिली रेल्वेगाडी ३० रोजी जळगावातून निघणार आहे. या रेल्वेगाडीतील साडेआठशेवर ज्येष्ठ भाविकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हिरवी झेंडी दाखवतील.
सीसीटीव्हींसाठी २० कोटींची तरतूद
जिल्ह्यातील प्रत्येक जि.प.शाळेत आता सीसीटीव्ही प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २० कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगरातील २११ आणि धरणगावच्या भोलाणेतील १७८ अतिक्रमणधारकांना जमिनीचा लाभ दिला जाणार असून त्या जागेत घरकुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यावेळी आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी अरुण पवार उपस्थित होते.
३० सप्टेंबरला मिळणार लाडकी बहिणचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात ३० सप्टेंबर पर्यंत येणार असून जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २२२ पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. सर्व बँकाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार २६ सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या पात्र बहिणींचे केवायसी आणि आधार सिडींग नाही ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ९ लाख ७४ हजार ९५० एवढे अर्ज दाखल झाले. त्यातील ९ लाख ६१ हजार ८ एवढ्या बहिणी पात्र झाल्या आहेत. त्यांना १५०० रुपयाचे दोन हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. त्यातील १ लाख ७ हजार २२२ एवढ्या बहिणीच्या खात्यावर केवळ केवायसी आणि आधार सिडींग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. सर्व प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्राम स्तरावरची यंत्रणेकडून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.तसेच आधार सिडींग नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनाही पीकविमा सह विविध योजनांचे पैसे मिळाले नाहीत, या विशेष मोहिमेत त्यांचेही आधार सिडींग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या