धुळे(प्रतिनिधी)- शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये आज सकाळी चांगलीच खळबळ उडाली. कारण स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक थेट पोलीस ठाण्यांमध्ये हजेरी लावली. तेथील अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेला मुद्देमाल, फायलिंग आणि बेशिस्त पार्किंग पाहून एसपी धिवरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली.
स्थानिक गुन्हे शाखेसह धुळे शहर, धुळे तालुका, देवपूर, आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याला आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट देत स्वच्छतेची पाहणी केली. पण काही पोलीस ठाण्यांमधील अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेला मुद्देमाल, फाईली, धुळ आणि बेशिस्त पार्किंग व्यवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. काही पोलीस ठाण्यांचा असलेला गलथान कारभार पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि “हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही!” असा इशारा दिला. ताबडतोब सुधारणा करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही अधीक्षकांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिला. एसपींच्या संतापाचा फटका बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. दरम्यान स्वच्छतेसाठी एसपींचे रौद्ररूप पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली होती. आता या आदेशांची अंमलबजावणी होते की नाही, आणि खरोखरच पोलिस ठाण्यांची सुधारणा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.