Monday, May 27, 2024
Homeधुळेसत्ताधार्‍यांनी मनपाची तिजोरीच केली स्वच्छ : आ. फारुक शाह

सत्ताधार्‍यांनी मनपाची तिजोरीच केली स्वच्छ : आ. फारुक शाह

धुळे Dhule । प्रतिनिधी

कोरोना काळात बांबू घोटाळ्यासह विविध गैरव्यवहारांची (malpractices) चौकशी (Inquiry) विभागीय आयुक्तांमार्फत लावल्याने भाजपा नेत्यांसह नगरसेवकांना चांगलीच मिरची लागली आहे. त्यामुळे कालच्या महासभेत (General Assembly) सत्ताधार्‍यांनी अल्पसंख्याक भागातील विकास कामांना (Development works) विरोध केला. या सत्ताधार्‍यांना गोरगरिबांच्या प्रश्नांशी काही एक देणेघेणे नाही. ते केवळ कामांचा ठेका मिळविण्यासह टक्केवारी लाटण्यासाठी निवडणुका (Elections) लढवितात. त्यांनी शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याऐवजी मनपाची (Municipal Corporation) तिजोरी (Vault) चांगलीच स्वच्छ केली असल्याची टिका आज आ. फारुक शाह(MLA Farooq Shah) यांनी पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

शहरातील गुलमोहर विश्रामगृहात आज सकाळी आ.शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. काल मनपाच्या महासभेत स्लॉटर हाउसमागे घरकुल उभारण्याचा विषय तसेच मनपा शाळा क्र. 25 मध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे अल्पसंख्याक समाजासाठी उर्दू घर बांधण्याचा विषय नामंजूर करण्यात आला. त्यावर आ. शाह यांनी सत्ताधार्‍यांवर टिकास्त्र सोडले.

ते म्हणाले की, महासभेत काल एका नगरसेवकाने उर्दू घर म्हणजे काय, असा प्रश्न विचारून अकलेचे तारे तोडले. उर्दू घर ही राज्य शासनाने सुरू केलेली योजना असून, त्याद्वारे अल्पसंख्याक भागात उर्दू घर बांधले जाते. शेजारील मालेगावातही असे उर्दू घर बांधले आहे. धुळ्यात उर्दु घर व्हावे, यासाठी आपण मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे. मात्र, सुपारीबहाद्दर नगरसेवकाने या विषयावर राजकारण करत हा विषय नामंजूर केला. सत्ताधार्‍यांना उर्दू भाषेचा एवढा तिरस्कार का, असा सवालही त्यांनी केला. स्लॉटर हाउसमागील जागेत घरकुल बांधण्याचा विषयही महासभेत नामंजूर करण्यात आला. वास्तविक, ही जागा रहिवासासाठी आरक्षित आहे. मात्र, सत्ताधार्‍यांना गोरगरिबांप्रती काही देणे-घेणे नाही, त्यांना केवळ टक्केवारीशी घेणे-देणे असते, अशीही टिका त्यांनी केली.

त्यामुळेच विकासकामांना विरोध

देवपूरसह शहरात जे खराब रस्ते आहेत, त्यांचे डांबरीकरण न करता आपण काँक्रिटीकरण करणार आहोत. यामुळे काही डांबरचे ठेकेदार असलेले नगरसेवक दुखावले गेले. तसेच महापालिकेच्या तत्कालीन वादग्रस्त कचरा ठेक्यासह, बांबू घोटाळा तसेच अन्य दहा गैरव्यवहारांची चौकशी आपण विभागीय आयुक्तांमार्फत लावली आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयातील उपायुक्त सोनवणे, कार्यकारी अभियंता गावित व उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर या तिघांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यांनी चौकशीला सुरवातही केली आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना चांगलीच मिरची झोंबली आहे. त्यामुळेच विकासकामांना ते विरोध करत असल्याचा आरोप आ. शहा यांनी केला.

जाती-पातीचे राजकारण कधी केेले नाही

शहरात विकास कामे करतांना आपण कधी जाती-पातीचे राजकारण केले नाही. प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. गेल्या वर्षी शहरातील चार महत्त्वाच्या रस्त्यांचे काम मार्गी लावले. त्यात चाळीसगाव रस्त्याचे काम सुरू असून, चौकाचेही सुशोभीकरण केले जात आहे. येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे लोकार्पण होईल. प्रकाश चित्रपटगृह ते पारोळा चौफुली रस्त्याचे काम पूर्ण केले. वडजाई रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. साक्री रोडसाठी दोन टप्प्यांत चार कोटी व दोन कोटींचा निधी मंजूर करून आणला असून, त्याचेही काम लवकरच सुरू होईल. तसेच साक्री रोडवरील पथदिव्यांसाठी मनपाकडे 37 लाख रुपये वर्ग केले आहेत. लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होईल. तसेच मोतीनाला पुलाचे रुंदीकरण करणार असून, यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमणाकडे कानाडोळा

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून त्या अतिक्रमितांचे पुर्नवसन करून या रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे. त्यासाठी आयुक्तांसोबत बैठकाही सुरू आहेत. परंतु, आयुक्तही याकडे कानाडोळा करत असल्याचे आ. शहा यावेळी म्हणाले.

बोलण्यापेक्षा कामात वेळ

मी बोलण्यापेक्षा कामात वेळ घालवतो. कोविड काळातही घरात बसून राहिलो नाही. कोविड रुग्णांसाठी हिरे रुग्णालयात सर्व व्यवस्था करण्यासह वेळोवेळी बैठका घेतल्या. जुने जिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर कार्यान्वित केले. रूग्णवाहिका दिली, ऑक्सिजन प्लांट उभारला. तसेच शहरातील तब्बल पाच हजार केशरीकार्ड शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळवून दिला. शहरातील 200 दिव्यांग बांधवांनाही पिवळे रेशनकार्ड आमदार कार्यालयामार्फत वाटप केले. इतरांप्रमाणे घरात बसून राहिलो नाही, असा टोलाही त्यांनी मारला. दरम्यान, रावेर एमआयडीसीसाठी 123 एकर जागा लवकरात लवकर अधिग्रहीत करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही आ.फारूक शाह यांनी स्पष्ट केले.

तर सर्व कारनामे बाहेर काढू

गेल्या आठ वर्षापासून त्यांनी धुळेकरांसाठी आतापर्यंत कोणती कामे केली, हे सांगावे, असा सवाल करत आ. शाह यांनी खासदारांचे नाव न घेता त्यांच्यावरही आरोप केले. एका महिन्यात एक तरी काम त्यांनी केले का, असा प्रश्न उपस्थित केला. पांझरा नदी संवर्धन योजनेसाठी आपण मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला असून, त्याबाबतचे पत्रही आपल्या नावे आले आहे. असे असताना कालच्या महासभेत सत्ताधार्‍यांनी या योजनेचे श्रेय खासदारांना देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

हे श्रेय घेणे म्हणजे काम करे मुर्गा, अंडा खाए अब्दुल, असे आहे. खासदारांसह काही लोकांनी उर्दू भाषिकांच्या जागा बळकविल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. खासदारांनी कोणाच्या जागेवर सुसज्ज हॉस्पिटल बांधले आहे, याची आपल्याकडे माहिती आहे. यामुळे विकास कामे करा, इतरांनाही करू द्या, अन्यथा तुमचे सर्व कारनामे बाहेर काढू, असा इशाराही आ. शाह यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या