धुळे | प्रतिनिधी– अवघ्या पाचशे मिटरवर मध्यप्रदेश (एमपी) राज्याची सिमा असलेल्या शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारातील वनजमिनीवरील गांजाच्य आधुनिक शेतीवर शिरपूर तालुका व एलसीबीच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. त्यात तब्बल २ कोटी २० लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. काल दि. ८ रोजी दुपारपासून सुरू असलेली गांजाची मोजणी आज सायंकाळी संपली.
शिरपूर तालुक्यातील आंबा गाव शिवारातील रुपसिंगपाडा येथे वनजमीनीवर कैलास भावसिंग पावरा (रा.आंबा ता. शिरपुर) याने मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणार्या गांजा या अंमलीपदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अवैधरित्या लागवड केली असल्याची गोपनिय माहिती काल दि.८ रोजी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा व शिरपुर तालुका पोलिसांची दोन पथके तयार करुन संयुक्त कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व एलसीबीचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया राबवुन त्या ठिकाणी छापा टाकला. कैलास पावरा हा कसत असलेल्या या वनजमिनीवर गांजा अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली. मका व दादरच्या पिकाआड या गांजाची लागवड केलेली होती. ही गांजाची झाडे मजुरांमार्फत शक्त ती उपटण्यात व कापण्यात आली. एकुण २ कोटी २० लाखांची ११ हजार किलो गांजा वनस्पतीची हिरवी, ओली झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोहेकॉ पवन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर तालुका पोलीस ठण्यात गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (आयआय) (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई सुनिल वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलींद पवार, असई कैलास जाधव, पोहेकॉं पवन गवळी, पोहेकॉ अनिल चौधरी, आरीफ पठाण, पोकॉ मनोज नेरकर, पोहेकॉ चेतन बोरसे, पोकॉ कमलेश सुर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी व चालक पोकॉ सतिष पवार, सागर कासार यांच्या पथकाने केली.
- पिक वाढीसाठी ठिबकची व्यवस्था– शिरपूर तालुक्यातील आंबा हे गाव मध्यप्रदेश सिमेलालागून असून ते शिरपूर तालुका पोलिस ठाण्यापासून १५ ते २० कि.मीवर व मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आहे. रस्ता नसल्यामुळे गांजा शेती लवकर लक्षात येत नाही. असे असतांनाही गांजाची आधुनिक पध्दतीने गांजाची लागवड केलेली होती. गांजाच्या पिकांची वाढ होण्यासाठी संपुर्ण शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली दिसून आली. याबरोबच मका, दादर पिकाच्या आड गांजाची लागवड केलेली होती.