धुळे (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नवीन वर्ष २०२५ आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मित, विक्री व वाहतूकीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार आज दि.२९ रोजी तालुक्यातील बोरीस शिवारात बनावट ग्राहक बनुन छापा टाकला. तिन जणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून बनावट मद्यासह एकुण पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बनावट विदेशी मद्य हे विक्रीच्या उद्देशाने तीन जण जवळ बाळगून असल्याची गोपनिय माहिती राऊशुच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार राऊशुच्या पथकाने तिघांनी माहिती काढत बनावट ग्राहक बनून त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. तेव्हा तिघांनी वाहन घेवून येण्यास सांगितले. त्यानंतर पथकाने तिघांनी सांगितलेल्या ठिकाणी धुळे तालुक्यातील बोरीस शिवारातील सरवड-निजामपूर रस्त्यावरील हॉटेल योगराज येथे येवून सापळा लावला. काहीवेळाने तिघे वाहनात बनावट विदेशी मद्य घेवून आले असता त्यांना पकडण्यात आले. शौकत इस्माईल खाटिक, सदाशिव बाळू शिंदे व जितेंद्र दिलीप भिल अशी तिघांनी त्यांची नावे सांगितली. या ठिकाणी शामराव सदाशिव शिंदे हा बनावट विदेशी मद्याची रोख रक्कम घेण्यासाठी एमएच-१८-बीएन-४९८३ वर थांबलेला होता. त्यास पोलीस असल्याचा संशय आल्याने तो वाहन सोडून अंधारात फरार झाला. अटकेतील तिघांनी दाखविलेल्या घटनास्थळापासून थोड्या अंतरावर एका पक्क्या घरात दारूबंदी गुन्ह्याच्या मुद्देमालाचा शोध घेतला असता घरात बनावट विदेशी मद्य मिळून आले. गुन्ह्यमध्ये इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या व ओसी ब्ल्यू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या जुन्या बाटल्यामध्ये बनावट विदेशी मद्य भरलेल्या १९२० सिलबंद बाटल्या (एकुण ४० बॉक्स), एक दुचाकी व एक मोबाईल असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रूपये किमंती मुद्देमाल जप्त करण्यात आला. म्हणून तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (ई), ८३, ९० व १०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एल.दिंडकर आर.आर.धनवटे, दुय्यम निरीक्षक एस.एस.शिंदे, एस.एस. आवटे, सहा.दुय्यम निरीक्षक अनिल निकुंबे, जितेंद्र फुलपगारे तसेच जवान मयूर मोरे, कल्पेश शेलार, बाळकृष्ण सोनवणे, दीपक अहिरराव, मनोज धुळेकर, दारासिंग पवार, गौरव सपके, वाहन चालक व्ही.बी.नाहीदे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.एस.आवटे हे करीत आहे.