धुळे | प्रतिनिधी– शहरात छुप्या पध्दतीने गुंगीकारक औषधे विक्री करीत तरूणांना नशेची लत लावणार्या एकास चाळीसगाव रोड पोलिसात गजाआड केले आहे. त्याच्याकडून ८८ हजारांच्या गुंगीकारक औषधीच्या ४८० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
शहरातील शब्बीर नगर परीसरात मुगणे मस्जिद समोर एक जण बेकायदेशीररीत्या गुंगीकारक औषधी बाळगुन त्याची चोरटी विक्री करत असल्याची खात्रिशीर माहिती काल दि.२८ रोजी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि जिवन बोरसे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह छापा टाकत एकास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अकबर अली कैसर अली शहा (वय ३२ रा. प्लॉट नं. ८७, मुगणे मस्जिद समोर, शब्बीर नगर, शंभर फुटी रस्ता, धुळे) असे सांगितले. त्यांच्याकडून मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणार्या गुंगीकारक औषधाचा साठा मिळुन आला. ८८ हजार ५२० रूपये किंमतीच्या प्रत्येकी १०० मिली मापाच्या निळे झाकण असलेल्या एकुण ४८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोसई शरद लेंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सपोनि जिवन बोरसे यांच्यासह पोसई शरद लेंडे, हरिश्चंद्र पाटील, पोहेकॉं सुनिल पाथरवट, अविनाश वाघ, पोकॉं सारंग शिंदे, विनोद पाठक, स्वप्निल सोनवणे, इंद्रजीत वैराट, विशाल गायकवाड, माधुरी हटकर यांच्या पथकाने केली.