धुळे (प्रतिनिधी) – कंटेनरमधून काळ्याबाजारात जाणारे तांबे व ॲल्युमिनियमच्या भंगार मालाची तस्करी नरडाणा पोलिसांनी रोखली. बनावट बिल्टी तयार करुन ही चोरटी वाहतूक केली जात होती. या कारवाईत कंटेनरसह एकुण १ कोटी २३ लाख ७४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर चालकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने कंटेनरमधून (क्र.आर.जे.११/जी.सी.२७७९) बेकायदेशीररित्या तांबे व अल्युमिनीयमच्या भंगार मालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नरडाणा पोलीस ठाण्याचे सपोनी निलेश मोरे यांना काल दि.६ रोजी मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह गव्हाणे फाटा येथे सापळा लावून कंटेनरला शिताफीने पकडले. वाहनावरील चालकाने त्याचे नाव कलीम अजीउल्ला खान ( वय २७ रा. बिबीयापुर पिढी मोहन गंज रायबरेली ता.तिलोही जि.अमेठी, उत्तर प्रदेश) असे सांगितले. तो कंटनेर वाहनात वाहनाचे मालक, मालाचे खरेदीदार व पुरवठादार यांच्या मदतीने तांबे व अल्युमिनीयमचा भंगार माल बेकायदेशीररित्या भरुन वाहनामध्ये प्रत्यक्षात असलेल्या मालाची बिल्टी न बनविता सोबत आणलेल्या बिल्टीमध्ये अल्युमिनीयमचा डस्ट स्क्रैप (भुसा) माल भरल्याचे व त्यामध्ये वर्णन, किंमत व वजन खोटे नमुद करुन खोटी व बनावट बिल्टी तयार करुन हा माल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतूने वाहतुक करित होता. त्यामुळे कंटेनरसह १ कोटी २३ लाख ७४ हजार ३५० किमतीचा तांबे व अल्युमिनीयमचा भंगार माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोकॉ गजेंद्र पावरा यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक-कलीम अजीउल्ला खान, वाहनाचे मालक (नावगाव माहीत नाही), मालाचे पुरवठादार (शिव ट्रेडींग कंपनी ५०३ महालक्ष्मी प्रुफ ४१ शिवाजी रोड लाईट पॉवर सप्लायर्स लिमी. बुधवार पेठ पुणे), मालाचे खरेदीदार-शाम मेटल एच.नं.२ बी मेहता इनक्लेव्ह उत्तम नगर रामानंद त्यागी मार्ग मंदीर विकास नगर न्यु दिल्ली, मालाचे खरेदीदार-एस. के. एन्टर प्राईजेस एस.नं.१०६. बिल्डींग नं. ७६५ एफ/एफ अमीत मोटर मार्केट चाबी गंज दिल्ली मोटर मार्केट काश्मीरी गेट न्यु दिल्ली, मालाचे खरेदीदार- बालाजी एन्टर प्राईजेस १८० न्यु उस्मानपुर गल्ली नं.९ अग्रवाल स्वीट न्यु उस्मानपुर न्यू दिल्ली व मालाचे खरेदीदार-अमन ट्रेडर्स एस/एफ १/१७७ पुंजा शरीफ गली सेरनवाली चांदनी चौक एरिया न्यू दिल्ली यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२), ३३६(२), ३३६(३),३४०(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोसई मनोज कुवर, विजय आहेर, पोहेकॉ ललीत पाटील, भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, रविंद्र मोराणीस, योगेश गिते, नारायण गवळी, चंद्रकांत साळुंखे, पोना भूरा पाटील, पोकॉ गजेंद्र पावरा, अर्पण मोरे, विजय माळी, सचिन बागुल, सुनिल गावीत व चालक पोकॉ सूरजकुमार सावळे यांच्या पथकाने केली.