धुळे (प्रतिनिधी)- शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. आज धुळ्यात तापमान 4 अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिक गारठले आहेत. हे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फिंगल चक्रीवादळाने थंडी गायब झाली होती. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घट झाली आहे. त्यात आज मंगळवार दि.10 डिसेंबर रोजी धुळ्यात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. धुळे जिल्हा आज 4 अंश सेल्सिअसवर गेला होता. वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी उशिरापर्यंत आणि रात्री लवकर धुळ्यातील रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे़. त्याचा परिणाम जनजीवनावर होऊ लागला आहे़. अनेकांना सर्दी, डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. दि. 7 रोजीचे तापमान 14 अंश सेल्सिअसवर होते. तर दि. 8 रोजी 9.5, दि. 9 रोजी 9.2 तर आज दि. 10 रोजी 4 अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. प्रशासनाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.