Monday, October 14, 2024
Homeजळगावनफ्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाची १८ लाखात फसवणूक

नफ्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाची १८ लाखात फसवणूक

नोएडाच्या चौघांविरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : डेटा व्हेरिफिकेशनच्या कामातून नफा देण्याचे अमिष दाखवत व्यावसायिक दीपक गोपीचंद नाथाणी (५०, रा. गणेश नगर) यांची १८ लाख ९१ हजार ५२ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान घडला. या प्रकरणी २४ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (रा. नोएडा, उत्तरप्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक दीपक नाथाणी यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते वर्क फ्रॉम होम पद्धतीचे काम ऑनलाईन शोधत होते. त्या वेळी त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यासाठी त्यांनी त्यावर दिलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील दोन व्यक्तींनी त्यांच्या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतात व ते कंपनीच्या फ्रॅन्चायसी चालविण्याकरिता देतात. त्यानुसार नाथानी हे पत्नी व एक मित्र असे तिघेजण नोएडा येथे संबंधित कंपनीत गेले व कंपनीचा मालक कुणाल शर्मा याला भेटले. तेथे दुसर्‍या कंपनीचा मालक त्रिदेव वढेरा व त्याची पत्नी निशू गुप्ता हेदेखील तेथे भेटले. तिघांनी कंपनीच्या कामाचे स्वरुप सांगितले व नफ्याबद्दलही माहिती दिली.
कंपनीच्या कामाची माहिती दिल्यानंतर नवीन सेटअपसाठी मनीष कुमार नामक व्यक्तीचा बँक खाते क्रमांक देऊन त्यावर एक लाख २१ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावर नाथाणी यांनी विश्वास ठेवला. तसेच पत्नी व स्वत:च्या नावावर फ्रॅन्चाईसी घेण्यासाठी करार करण्याचे ठरवून वेळोवेळी पत्नी व स्वत:च्या बँक खात्यावरून एकूण १८ लाख ९१ हजार ५२ रुपये दिलेल्या बँक खात्यावर पाठविले. या विषयी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळू लागले. नंतर तर संबंधित मोबाईल क्रमांकही बंद येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाथाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून त्रिदेव वढेरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (रा. नोएडा, उत्तरप्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या