Friday, September 20, 2024
Homeधुळेफक्त पाच तासात 6 गावठी कट्टे, 6 हत्यारांसह 10 आरोपी जेरबंद

फक्त पाच तासात 6 गावठी कट्टे, 6 हत्यारांसह 10 आरोपी जेरबंद

धुळे जिल्हा पोलिसांची सुपरफास्ट कारवाई; पहिल्यांदाच जिम, व्यायाम शाळांची तपासणी

धुळे । (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलाने नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवित अवघ्या पाच तासात 6 गावठी कट्टे, 6 हत्यारांसह दहा आरोपींना जेरबंद केले. तर तीन फरार आरोपींना देखील पकडले. याबरोबरच नाकाबंदी मोहिमेत मोटार वाहन कायद्यान्वये 149 जणांवर व 21 एक जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. नशे, टवाळखोरांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आचारसंहितेपूर्वी राबविलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगार, टवाळ खोरांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.

- Advertisement -

जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व शहर वाहतुक शाखेकडून दि.2 ऑगस्ट रोजी रात्री आठ ते दि.3 रोजी मध्यरात्री एक वाजेदरम्यान संपुर्ण जिल्हयात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात 28 पोलिस अधिकारी व 166 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. एकुण 22 ठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान 1 हजार 31 दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात मोटार वाहन कायद्यान्वये 149 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 23 हजार 750 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. 21 वाहनधारकांना ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. तर दारुबंदी कायद्यान्वये नऊ ठिकाणी कारवाई करीत 30 हजार 360 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. याबरोबरच 39 हिस्ट्रिशिटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. 103 बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस व गेस्ट हाऊसची तपासणी, 15 समन्सची व 14 वॉरंटची बजावणी केली गेली. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122 अन्वये दोन जणांवर कारवाई करण्यात आली. जिम तसेच ओपन जिमची तपासणी करीत नशाखोर, टवाळखोर व छेडछाड व गैरवर्तन करणार्‍या एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली.

6 गावठी कट्टे, 7 जिवंत राऊंड- ऑल आऊट ऑपरेशनमध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाने विना परवाना गावठी कट्टे (पिस्टल) बाळगणार्‍या 5 आरोपीतांवर आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे कारवाई करुन त्यांच्याकडुन 6 गावठी कट्टे व 7 जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले. त्यात सुरज प्रकाश मार्कंड (वय 26 रा.भाईजी नगर, चितोडरोड, धुळे), काशिफ शेख गुलाब मोहम्मद, (वय 21 रा.शंभर फुटीरोड, इब्राहीम मशिदमागे, धुळे), धर्मा दोघु मोरे (वय 29 रा.आरती कॉलनी, देवपूर), सुनिल ऊर्फ सनि धर्मा अहिरे (वय 24 रा. नाणे ता.धुळे) व रवी मोहन सोनी (वय 28 रा. देवझरी कॉलनी, सेंधवा, मध्यप्रदेश) यांच्याकडून हे कट्टे जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात संबंधीत पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

चार तलवारी, एक कोयता, चॉपर हस्तगत- तलवार बाळगणाऱ्या तीन आरोपीतांवर आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 प्रमाणे कारवाई करीत त्यांच्याकडुन 2 तलवार, 1 कोयता व 1 चॉपर हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी रोहित संतोष गवळी (रा. लक्ष्मीनगर, गवळी वाडा, मोगलाई, धुळे), शाहीद शहा जावेद शहा ( वय 19 रा. अशोक नगर, दोंडाईचा) व अजय संदीप सोनवणे (वय 19 रा. म्हाडा वसाहत, मोहाडी उपनगर, धुळे), नाजीम बाली (वय 35 रा.शब्बीर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व गणेश चंद्रकांत गवळी (वय 29 रा. आदर्श कॉलनी, देवपूर धुळे) यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. याबरोबरच मोहम्मद मोबीन जलील अहमद अन्सारी (वय 24 रा. वडजाई रोड, मिल्लत नगर, धुळे) याच्याकडून साडेचार हजारांच्या गुंगीकारक औषधींचा साठा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पहिल्यांदाच जिम, व्यायाम शाळांची तपासणी- जिल्ह्यात पहिल्यांदाच धुळे शहर उपविभागामध्ये एकुण 32 जिमनॅशियम /व्यायाम शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. काही जिममध्ये बॅन केलेले इंजेक्शन जे लवकर बॉडी तयार करण्यासाठी उपलब्ध केले जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली. प्रसंगी सर्व जिमचे संचालकांना समज देण्यात आली असून कायद्याच्या तरतुदी देखील सांगण्यात आल्या.

तीन फरार आरोपी गजाआड – धुळे तालुका व पिंपळनेर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवर असलेले पाहिजे/फरार आरोपीपैकी 3 पाहिजे आरोपीतांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यात धुळे तालुका पोलिसात दाखल भादंवि क.379, 34 गुन्ह्यातील राजेंद्र मल्हारी गायकवाड (रा.खडी वस्ती वाघाडे शिवार, ता. बागलाण जि. नाशिक) तसेच अमोल सुरेश चव्हाण ( रा.प्रशांत नगर, कलवाडी ता. मालेगाव जि. नाशिक) व पिंपळनेर पोलिसात दाखल भादंवि क.420, 34 मधील साहेबराव वामन ठाकरे (रा. चाफ्याचा पाडा, पो. जोरन ता. सटाणा जि. नाशिक) याचा समावेश आहे.
दरम्यान ऑपरेशन प्रभावी होण्याचे दृष्टीने स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाकाबंदी पॉईटला भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या