Sunday, February 9, 2025
Homeधुळेबापच झाला हैवान… दारुसाठी तापी नदीत फेकत दोघा मुलांचा घेतला जीव

बापच झाला हैवान… दारुसाठी तापी नदीत फेकत दोघा मुलांचा घेतला जीव

थाळनेर येथील धक्कादायक घटना, हैवान बापाला पोलीस कोठडी

धुळे | प्रतिनिधी– शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे काल सायंकाळी नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून हैवान झालेल्या बापाने आपल्या दोघा चिमुकल्यांना थेट तापी नदीत फेकून त्यांचा जीव घेतला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हैवान बापावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत छायाबाई संजय कोळी (वय २९ रा. कुंभारटेक, थाळनेर ता. शिरपूर) यांनी थाळनेर पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार तिचा पती सुनिल नारायण कोळी (वय ३६) याला दारूचे व्यसन असून तो कुठलाही कामधंदा करत नसल्याने तो दारूसाठी पत्नीकडे पैशाची मागणी करीत तिच्याशी नेहमीच वाद घालत होता. काल दि. ४ रोजी दुपारी देखील त्याने पत्नी छायाबाईकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र तिने पैसे दिले नाही. त्या कारणावरून सुनिल कोळी याने सहा वर्षाचा मुलगा कार्तिक व तीन वर्षाची मुलगी चेतना या दोघा चिमुकल्यांना सोबत घेत थेट गावातील तापी नदी गाठली. दोघांना तापी नदीच्या पाण्यातील बेशरमच्या झाडात फेकुन दिले. त्यानंतर सुनिल कोळी या फरार झाला. दरम्यान पाण्यात बुडून दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सायंकाळी दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आल्याने ग्रामस्थांनी पोहणार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मुलांच्या मृत्यूचीबाब कळताच आई छायाबाई कोळी यांनी एकच आक्रोश केला. तसेच पती विरोधात थाळनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार सुनिल कोळी यांच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला आज सकाळी भाटपुरा परिसरातून अटक केली. तसेच दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या