धुळे (प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आज वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण १९ हजार ५५३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच एकूण २३ कोटी ३२ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान वसूल करण्यात आली. विशेष म्हणजे या लोकदलतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणामध्ये समझोता करीत ६ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले. याबरोबरच अपघातात जखमी तरुणास २६ लाखांची भरपाई मिळवून देण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हयात आज शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित ३ हजार २०८ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वाटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपुर्व ९६ हजार ९४४ प्रकरणे ज्यामध्ये ग्रामपंचायत, महानगरपालिका पाणी पट्टी व घरपट्टी प्रकरणे, विज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणे ३२० व दाखलपुर्व १९ हजार २३३ प्रकरणे असे एकुण १९ हजार ५५३ समोपचाराने निकाली निघाली. सदर लोकअदालतमध्ये २३ कोटी ३२ लाख ६१ हजार रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली. लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
धुळे जिल्हात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणामध्ये ६ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले. तसेच मोटार अपघात प्रकरणापैकी १०९ प्रकरणे तडजोडीने निकाली होवुन ८ कोटी ७५ लाख १० हजार ७४१ पक्षकारांना वसुल करून देण्यात आली.
अपघातात जखमी तरुणास २६ लाखांची भरपाई- धुळे येथील मोटार अपघात न्यायाधिकरणमध्ये दाखल खटल्यामध्ये अर्जदार ज्ञानेश्वर रमेश पगार हे दि.२६ जुलै २०२३ रोजी मालेगाव येथून सूरतकडे बोलेरो पिकअपने जात असतांना उच्छल-निझर रस्त्यावर समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर पगार यांच्या मणक्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याना ८० टक्के अपंगत्व आले. त्याच्या नुकसान भरपाईचा अर्ज हा ऍड. सुरेश वाघ यांच्या मार्फत दाखल केला होता. यामधील प्रतिवादी विमाकंपनी रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीचे वकील ऍड. अश्वघोष हातेकर आणि कंपनीचे अधिकारी सरोज चौधरी यांनी अर्जदाराचे अपंगत्व विचारात घेवून अर्जदाराला न्याय देण्याच्या हेतुने लोकअदालतमध्ये २६ लाख ५० हजार नुकसान भरपाई दिली.
लोकअदलासाठी यांचे सहकार्य – लोकअदालतसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलीस, सर्व बँका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, महानगरपालिका आदींनी सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदिप वि. स्वामी यांनी आभार व्यक्त केले.