धुळे | प्रतिनिधी- लग्न समारंभात चोरी करणार्या मध्यप्रदेशातील गँगचा येथील मोहाडी पोलिसांच्या विशेष पथकाने मोठया शिताफीने पदाफार्श केला. यासाठी पथकाने थेट नऊ दिवस मध्यप्रदेशातील राजगढ येथे मुक्काम ठोकत चोरट्यांना निष्पन्न केले. गुलखेडी शिवारातील जंगलात छापा टाकला. परंतु पोलिसांची चाहूल लागतात चोरटे पसार झाले. चोरट्यांच्या घरवजा झोपडीची तपासणी केली असता चोरट्यांनी धुळ्यातील हॉटेल कृष्णा रिसोर्ट येथील लग्न समारंभातुन लंबविलेले २६ तोळे सोने मिळून आले. त्याची किंमत १५ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. मोहाडी पोलिसांच्या या बेस्ट कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
शहरातील साक्री रोडवरील साईकृपा सोसायटीत राहणार्या प्रतिभा राजेंद्र बोरसे (वय ५४) यांची मुलगी सलोनी हिच्या लग्नसभारंभानिमित्त दि. २ डिसेंबर रोजी रात्री धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे श्रीमंती पुजन व संगिताच्या संगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमादरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वधु सलोनी व तिची आई प्रतिभा यांचे एकूण २६ तोळे सोने असलेली (सोन्याचे पोहे हार, नेकलेस, सोन्याचे काप, बांगडया, तिन चैन, टाप्स, इतर सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल) पर्स एक लहान मुलगा व दुचाकी वरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी उचलून चोरून नेली. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत १५ लाख ९८ हजार रुपये होती. याबाबत प्रतिभा बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीची पध्दत सारखीच- गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गुन्हयाचे तपासाबाबत सुचना देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी तपास सुरू करीत माहिती घेतली असता नंदुरबार जिल्हयातील शहादा व अकोला जिल्हयात देखील अशाच प्रकारे गुन्हे दाखल असून चोरी करण्याची पध्दत देखील सारखीच असल्याचे दिसून आले.
विशेष पथक रवाना- त्यावरून पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी पोसई अशोक पायमोडे, पोकॉ प्रकाश जाधव, मनिष सोनगिरे यांचे एक विशेष पथक तयार करून, लग्न समारंभात चोरी करणारी गँग ही मध्यप्रदेश राज्यातील राजगढ जिल्हयातील बोडा पोलीस ठाणे अंतर्गत सांसीकढीया, गुलखेडी येथील असल्याची माहिती प्राप्त केली. त्याबाबत वरिष्ठांना कळवून विशेष तपास पथक हे राजगढ येथे रवाना केले.
सलग ९ दिवस थांबून गँगचा केला पर्दाफाश- विशेष पथकाने सलग ९ दिवस राजगढ येथे राहून निरीक्षक शशिकांत पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत तेथे गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून चोरी करणारे गौरव बबलू सांसी, सावंत ऊर्फ चप्पू भारतसिंग सांसी, कालू गोली सांसी व बबलू सुमेर सिसोदिया, सर्व (रा. हुलखेडी, गुलखेडी, ता. पचोड, जि. राजगढ) हे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची माहिती काढली. चौकशीत नातेवाईकांनी आरोपी हे गुलखेडी गावाकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात वास्तव्य करीत असलेल्या घरवजा झोपडी या ठिकाणी तुम्हाला मिळतील, अशी माहिती दिली.
चोरटे निसटले, ऐवज हस्तगत-त्यानुसार पथकाने बोडा पोलीस ठाण्याच्या मदतीने जंगलात शोध सुरू केला. तेव्हा पोलिसांना पाहुन चौघे चोरटे फरार झाले. त्यांच्या राहत्या ठिकाणाची झडती घेतली असता गुन्हयातील चोरीस गेलेला माल फिर्यादमध्ये नमुद वर्णनाप्रमाणे असल्याची खात्री झाल्याने दाखल गुन्हयातील २६ तोळे सोन्याचा मुद्देमाल जप्त करून हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोसई पायमोड हे करीत आहेत.
या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या पीआय शशिकात पाटील, विशेष पथकातील पीएसआय अशोक पायमोडे, पोकॉं प्रकाश जाधव व मनिष सोनगिरे यांच्या पथकाने केली.