धुळे । प्रतिनिधी- शिरपूर शहरातील खालचे गाव बौध्दवाडा येथून पोलिसांनी तिघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून चार लाखांच्या पाचशेे रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. काल दुपारी झालेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. तिघांना दुपारी न्यायालयात हजर केले तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
शिरपूरातील बौध्दवाडा येथून दुचाकीने (क्र.एमएच 18 सीबी 8567) संशयीतरित्या जाणार्या तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 4 लाख 11 हजार 500 रूपये किंमतीच्या भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणार्या पाचशे रूपयांच्या 823 नोटा मिळून आल्या. त्यासह 10 हजाराचा मोबाईल, 1 लाख 25 हजारांची दुचाकी व एक बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोकाँ विनोद आखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर (वय 27 रा. हट्टी ता. शिरपूर), पिरन सुभाष मोरे (वय 23 रा. चांदपुरी ता. शिरपूर) व रंगमल रवितलाल जाधव (वय 25 रा. ऐंजाळे ता. साक्री) या तिघांविरोधात भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 180, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, या बनावट नोटा कुठे तयार केल्या जातात? कोण तयार करतो? हे तिघे या नोटा कोणाकडे नेत होते, यात आणखी कोण कोण सहभागी आहेत? या दिशेने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.