Wednesday, June 26, 2024
HomeUncategorizedश्रीरामपूर, करंजी परिसरात वादळी पावसाचा तडाखा

श्रीरामपूर, करंजी परिसरात वादळी पावसाचा तडाखा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

शहरासह तालुक्यातील अनेक भागात काल सायंकाळी आलेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर विजेचे पोलही वाकले. त्यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वार्‍याबरोबर सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसाने शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित असल्याने आज होणारा श्रीरामपूर शहर व बेलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. या पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. सध्या शेतामध्ये काढलेला कांदा झाकविण्यासाठी शेतकर्‍याची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले नसून उलट सुकत असलेल्या चारा पिकांना थोड्याफार प्रमाणात जीवदान मिळाले. विशेषता तालुक्यातील खोकर, भोकर सह वडाळा महादेव, माळवाडगाव आदी भागात हलका पाऊस झाला तर काही भागात मोठ्या प्रमाणावर वादळ झाले.

आलेल्या वादळी वार्‍याने वडाळा महादेव परिसरात तसेच शहरात अक्षय कॉर्नर,डीडी काचोळे शाळे समोर तसेच राहिंज हॉस्पीटल समोर झाडे पडल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिला होता. काल सकाळीच तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. सायंकाळी 4 वाजता वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात विद्युत पोल वाकले, वीज तारा तुटल्या अवकाळीने सर्वांची दाणादाण केली असून अनेक भागात वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

घरावर झाड कोसळले, पॉलिहाऊसचे शेड उद्ध्वस्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसरात वादळी वार्‍यांसह तुफान गारांचा पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात आज गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास वादळी वार्‍यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे परिसरात पॉलिहाऊसची तीन शेड उद्ध्वस्त झाले असून जनावरांच्या शेड असे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर अचानक आलेल्या वादळासह गारांच्या पावसाने करंजी नऊ चारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांचा मोठा खोळंबा झाला. या वादळी वार्‍याने मोठ्या प्रमाणात कैर्‍या पडल्या आहे. तरी प्रशासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकर्‍यांसह नागरिकांनी केली आहे.

वादळी वार्‍यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या घरांचे व शेडचे पत्र उडून गेलेले असून रस्त्यावर मोठमोठी झाडे उनमळून पडलेली आहे. यामुळे लाईटच्या तारा देखील तुटलेल्या आहेत. या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिलेल्या असून यामध्ये जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे

  • आ. आशुतोष काळे
- Advertisment -

ताज्या बातम्या