धुळे | प्रतिनिधी- महाराष्ट्रातील महायुती सरकारला जनतेने निवडून दिलेले नाही, तर त्यांनी पक्ष फोडून सरकार स्थापन केले. त्यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर आणले. जनतेला महा दु:खी करण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्याला व देशाला खिळखिळे केले आहे. भाजपाने देशात व्देष पसरविण्याचे काम केले. त्यामुळे जनता आता त्यांना स्वीकारणार नाही. त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल, असा हल्लाबोल समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. अखिलेश यादव यांनी धुळ्यात जाहिर सभेत केला. महाराष्ट्राची ही निवडणूक ऐतिहासिक व देशातील राजकारणावर परिणाम करणारी असून येथे महायुतीचे सरकार हटले तर दिल्लीतीलही हटेल, उत्तर प्रदेशातही बुलढोझरची भाषा करणारे देखील हटतील, असेही ते म्हणाले.
शहरातील जेल रोडवर समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागिरदार यांच्या प्रचारार्थ आज खा.अखिलेश यादव यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आ.रईस शेख, उत्तर प्रदेशातील खा.इकरा हसन चौधरी, आ.नाहीद हसन, उमेदवार इर्शाद जहागिरदार आदी उपस्थित होते. उत्तर प्रदेशात सपाची कामगिरी सर्वांनीच पाहिली. तसे वातावरण सपासाठी धुळ्यात पहायला मिळत आहे. त्यामुळे इर्शादभाईंचा विजय आम्हाला निश्चित वाटतो. सुशिक्षीत असलेल्या इर्शादभाईंना धुळेकरांनी विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही सभेत खा. यादव यांनी केले.
सभेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही इंडिया गठबंधनचाच एक भाग आहे. त्यामुळे धुळे आणि मालेगावसह १२ जागांची मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेलच. वेळ पडली तर कमी जागा लढू मात्र हरीयाणात झाली ती चुक महाराष्ट्रात होवू नये. असाच प्रयत्न आमचा आहे. म्हणूनच महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल, असा विश्वासही खा.यादव यांनी व्यक्त केला.