धुळे | प्रतिनिधी
शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल राज पॅलेस येथे खुनी हल्ला करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने जेरबंद केले. त्यांना मोहाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हॉटेल राज पॅलेस येथे दि.२९ जुन रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमोल राजेंद्र देसले व त्याचे मित्र राज ऊर्फ कृष्णा जगन अहिरे, मनोज भगवान शिरसाठ हे जेवण करीत होते. तेव्हा त्यांच्या ओळखीचे भुषण रोहिदास पाचारे व कृष्णा दिनेश गायकवाड तेथे आले. त्यांनी राज ऊर्फ कृष्णा जगन अहिरे यास दारु पाजण्याच्या कारणावरुन वाद घातला. त्यानंतर राज व अमोल देसले या दोघांच्या डोक्यावर रॉड व काचेची बाटली मारुन खुनी हल्ला करुन पळुन गेले. याबाबत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासुन दोघे संशयित फरार होते. त्यांंचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक नियुक्त केले होते. या पथकाकडून शोध सुरू असतांना दि.४ रोजी पोहेकॉ संदीप पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने सुरत बायपास रोडवरील हॉटेल भंडारा जवळून भुषण शिवदास पाचारे (वय २७ रा. नवजीवन नगर, फाशीपुल, चितोड रोड, धुळे) व कृष्णा दिनेश गायकवाड (वय २२ रा. राऊळवाडी, चितोड रोड, धुळे) या दोघांना पकडले. त्यांच्या मोहाडी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार, असई शाम निकम, पोहेकॉ संदीप सरग, संतोष हिरे, मायुस सोनवणे, संदीप पाटील, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, किशोर पाटील, योगश जगताप यांच्या पथकाने केली.