धुळे | प्रतिनिधी– येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल दुचाकी चोरट्याला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे २२ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या एकुण ३३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे धुळे, पुणे, शिर्डीसह विविध जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल ३२ गुन्ह्याची उकल झाली आहे. एलसीबीच्या या कामगिरीचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष कौतूक केले.
शहरातील गरुड कॉम्ल्पेक्स समोरुन दि.३ मार्च रोजी सायंकाळी जितेंद्र गुलाबराव पाटील (रा.धुळे) यांची एमएच १८ एबी २४४४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरु असतांना आज दि.३ रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय माहिती मिळाली की, हा गुन्हा बळसाणे (ता. साक्री) येथील योगेश शिवाजी दाभाडे (वय २४) याने केला असुन तो बळसाणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पथक तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पथकाने बळसाणे येथुन योगेश शिवाजी दाभाडे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हयाची कबुली दिली. तसेच धुळे, शिंदखेडा, पुणे, शिर्डी, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, नंदुरबार येथून एकुण ३३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच वेगवेगळया ठिकाणी लपवुन ठेवलेल्या व विक्री केलेल्या ३३ दुचाकी काढुन दिल्या. एकुण २२ लाख २५ रुपये किंमतीच्या ३३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. योगेश दाभाडे यास धुळे शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
३२ गुन्ह्यांची उकल- जप्त दुचाकींपैकी धुळे शहरातील ११, नाशिक जिल्हयातील १४, पुणे ३, जळगाव २, शिर्डी १, नंदुरबार १ येथे दाखल दुचाकी चोरीचे एकुण ३२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोक्कातर्ंगत कारवाई, होता फरार– योगेश दाभाडे याच्यावर पुणे येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचींगचे गुन्हयात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असुन तो गुन्हयात फरार होता. त्याचेविरुध्द यापुर्वी रामानंद पोलीस ठाणे (जळगाव), भोसरी पोलीस ठाणे (पुणे), पिंपरी पोलीस ठाणे (पुणे), पारोळा पोलीस ठाणे (जळगाव), धुळे शहर पोलीस ठाणे (धुळे), अंबड पोलीस ठाणे (नाशिक), गंगापूर पोलीस ठाणे (नाशिक), दोंडाईचा पोलीस ठाणे (धुळे), हिंजवडी पोलीस ठाणे (पुणे) येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, पोउनि.प्रकाश पाटील, असई. संजय पाटील, पोहेकॉ. मायुस सोनवणे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, पोना. धमेंद्र मोहिते, पोकॉ. योगेश जगताप, किशोर पाटील, अतूल निकम व हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली.
जप्त दुचाकींची खात्री करावी- हस्तगत केलेल्या दुचाकींचे चेसीस नंबर व इंजिन नंबरवरुन फिर्यादींनी आपल्या चोरीस गेलेल्या दुचाकींची खात्री करुन घ्यावी. तसेच कायदेशिर सोपस्कार पूर्ण करुन धुळे शहर पोलीस ठाण्यातून ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.