धुळे : (प्रतिनिधी) । अरे बापरे…, धुळ्यात बनावट पनीर तयार करण्याचा कारखाना आढळून आला असून आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने या कारखान्यावर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत तब्बल तीनशे किलो बनावट पनीर आढळून आले असून ते नष्ट करण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी केमिकलचा साठा, इतर साहित्य व सुमारे 300 किलो बनावट पनीर देखील आढळून आले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून विनापरवाना हा कारखाना सुरू होता. अन्न व औषध प्रशासन विभागाचे संदीप देवरे, डॉ. अमित पाटील यांनी पनीरचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.दरम्यान पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कारखान्याला भेट देत पाहणी केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.