धुळे । प्रतिनिधी– आर्मीत भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तालुक्यातील रामी येथील तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय यशवंत माळी (वय 21) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
अक्षय माळी याने दि. 25 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गावालगत मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास असई संजय बोरसे करत आहेत.
अवघ्या एक दोन गुणांनी स्वप्न दूर गेले
अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे, अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या. अक्षय अत्यंत मनमिळाऊ आणि गुणी स्वभावाचा तरुण होता. बीएससीचे शिक्षण घेत असतानाच तो आर्मी भरतीसाठी झटत होता. त्याच्या जवळचे काही जण भरती झाले होते मात्र, अक्षय हा अवघ्या एक दोन गुणांनी राहत होता. त्यामुळे त्याच्या मनात काय चालले होते, हे कोणालाच कळाले नाही.
मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर.., वडिलांचे हुंदके…
अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत. मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही… असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही. हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो… मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले, या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या.
मुलांशी संवाद ठेवा, एसपींचे आवाहन
पालकांनी आपल्या घरातील मुलांशी सतत संवाद साधावा, त्यांना बोलते करावे आणि त्यांच्या मनातील विचार जाणून घ्यावेत, असे भावनिक आवाहन एसपी श्रीकांत धिवरे यांनी या घटनेच्या निमित्ताने केले आहे. मानसिक ताण आणि नैराश्य वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या मनातील दडपण कमी करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.