धुळे (प्रतिनिधी) : लाचखोरी विरोधात धुळे एसीबीच्या पथकाने आज सलग दुसरी कारवाई केली. काल धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहायकास 13 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले होते. तर आज पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करण्यासाठी परवाना देण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि खाजगी इसम तुषार जैन यांना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी शिरपूर येथील संकुलात भाडेतत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. यासाठी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जासंदर्भात तक्रारदार व त्यांच्या आतेभावाने धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली.
तेव्हा देशमुख यांनी तक्रारदारांना शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह ४ मार्च रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळपरीक्षण करणार असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारांना तुषार जैन यांच्याकडे 8 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा पुढील कार्यवाही करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच दिवशी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली.त्यानुसार एसीबीने ४ मार्च रोजी पडताळणी केली. त्यावेळी औषध निरीक्षक देशमुख यांनी खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह शिरपूर येथे जाऊन तक्रारदारांच्या दुकानाचे स्थळपरीक्षण केले. त्यावेळी तुषार जैन यांनी तक्रारदारांकडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला. त्यानंतर आज दि१.१ मार्च रोजी धुळे शहरातील पारोळा चौफुली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांकडून तुषार जैन यांनी कारमधून येऊन 8 हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनाही अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७-अ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथका ने नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.