Monday, July 8, 2024
HomeUncategorizedकांदा व्यापारी फसवणूकप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक

कांदा व्यापारी फसवणूकप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक

दुबईत पळून जाण्याच्या होता तयारीत, पोलिस कोठडीत रवानगी

धुळे | प्रतिनिधी- तालुक्यातील नेर येथील कांदा व्यापार्‍याची ५८ लाख रुपयांत फसवणूक करुन सुमारे ३ महिन्यापासून पसार असलेल्या मुख्य आरोपीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकार्‍यांच्या मदतीने येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तो दुबई येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
व्यापारी स्वप्नील संजय जयस्वाल (वय ३७ रा. नेर) यांची २८ एप्रिल २०२३ ते १४ मार्च २०२४ दरम्यान कांदा निर्यातीत ५८ लाखात फसवणूक करण्यात आली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिसात मुख्य आरोपी कलीम सलीम शेख (वय ३०), सलीम फत्तूभाई शेख, सरजील उर्फ बाबा सलीम शेख, तस्लीम सलीम शेख (रा.पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस रेल्वे स्टेशन रोड, येवला जि.नाशिक), पिंटया उर्फ प्रमोद लक्ष्मण पोळ (रा.नांदगाव रोड, येवला), रऊफ अब्दुल रज्जाक शेख (रा. शिंदे मळा, अवनकर गल्ली येवला), अनिल भिकन सोनवणे ऊर्फ सिंगम ऊर्फ गोल्डी (रा. मालाड, मुंबई), भिकन सोनवणे,जिजाबाई भिकन सोनवणे (रा. शिवप्रसाद कॉलनी, धुळे), अमोल बेडसे (रा.गंगापूर रोड, नाशिक) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे.
अशी केली फसवणूक- मुख्य आरोपी कलीम सलीम शेख याचा भारतातून दुबई देशात कांदा निर्यातीचा व्यापार असून इतर सह आरोपी हे या व्यवसायात पार्टनर आहे. अनिल सोनवणे याने कांदा मालाचे विदेशात एक्सपोर्ट केल्यास दरमहा चांगली कमाई होईल असे आमिष दाखवून फिर्यादीने स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्याकडून स्वखर्चाने कांदा विकत घेवून तो आरोपी कलीम शेख याने पाठविलेल्या कंटेनरमध्ये भरुन ५५ लाख २४ हजरी ६२४ रुपयांचा कांदा माल वेळोवेळी दुबई येथे एक्सपोर्ट केला. तसेच आरोपी कलीम शेख याने कंटेनर बुक करण्यासाठी पैसे नसल्याने आरोपी सलीम शेख, सरजील शेख, तस्लीम शेख व रऊफ शेख यांचे रहाते घरी ५ लाख रुपये रोख देण्यास सांगितले. त्यावरुन फिर्यादीने ती रक्कम दिली तसेच आरोपी अनिल सोनवणे याने मिरची व लसून एक्सपोर्ट करण्यासाठीचे व्यवसायासाठी ३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितल्याने ती रक्कम फिर्यादी याने आरोपी अनिल सोनवणे यास रोख दिली. तसेच एक्सपोर्ट व्यवसायातील रक्कम परतची हमी आरोपी भिकन सोनवणे, जिजाबाई सोनवणे व अमोल बेडसे यांनी घेतली. परंतु दुबई येथे कांदा विक्री केल्यानंतरही मालाचे पेमेंट फिर्यादने वेळोवेळी मागणी करुन सुध्दा अद्याप पावेतो कोणताच परतावा परत न करता आरोपींनी संगनमताने कट रचून फिर्यादीची एकूण ५८ लाख १२ हजार ९५ रुपयांची आर्थिक फसवणूक केली म्हणून हा गुन्हा दाखल होता.
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास-गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपी कलीम सलीम शेख व इतर आरोपींचे शोधासाठी वेळोवेळी येवला, मनमाड, नाशिक, मुंबई परिसरात शोधपथक पाठवून माहिती काढण्यात येत होती.
विमानतळांना दिली लूक आउट- मुख्य आरोपी कलीम सलीम शेख हा मिळून येत नसल्याने व तोे विदेशात पळून जाण्याचे तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आरोपीविरुद्धची लूक आउट नोटीस मुंबईसह भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिली होती.
इमीग्रेशन अधिकार्‍यांच्या मदतीने अटक- मुख्य आरोपी कलीम सलीम शेख हा भारत देशातून दुबई येथे पळून जाण्याचे बेतात असतांनाच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथील इमीग्रेशन अधिकार्‍यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दि.२४ जुन रोजी सहार पोलीस स्टेशन, मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. त्यास दि.२५ जुन रोजी न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोसई महादेव गुट्टे, असई गयासुद्दीन शेख, आर्थिक गुन्हे शाखेचे पोहवा श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -

ताज्या बातम्या