Thursday, September 19, 2024
Homeधुळेकॉपर केबल खरेदीसाठी आलेल्या वडोर्‍यातील व्यापार्‍यांच्या लुटीचा छडा

कॉपर केबल खरेदीसाठी आलेल्या वडोर्‍यातील व्यापार्‍यांच्या लुटीचा छडा

९ आरोपी निष्पन्न; हेंकळवाडीतील दोघांकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत संयुक्त पथकांची सुपरफास्ट कामगिरी

धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील हेंकळवाडी शिवारात कॉपर केबल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना लुटीचा पोलिसांनी काही तासातच छडा लावला. ९ आरोपींना निष्पन्न करीत दोन जणांना गजाआड केले. त्यांच्याकडून लुटीतील ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. धुळे तालुका व एलसीबीच्या संयुक्त पथकाने ही सुपरफास्ट कामगिरी केली.

- Advertisement -

गुजरात राज्यातील वडोदरा येथील स्क्रॅप खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी कुणाल मनिलाल पटेल (वय ३७) यांच्यासह इतर पाच व्यापारी मित्रांना स्क्रॅप कॉपर वायर खरेदी करावयाच्या बहाण्याने हेंकळवाडी बोलविण्यात आले होते. दि.५ रोजी धुळ्यात हेंकळवाडी शिवारात आल्यानंतर लुटारूंनी त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीटे, दागिने व सर्व मोबाईल, ऑनलाईन पध्दतीने रक्कम ट्रान्सफरकरुन करून घेत एकुण ६ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. याप्रकरणी काल धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार व धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या संयुक्त पथकाने गुन्हे पध्दत, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीनुसार हेंकळवाडीतील ८ ते ९ जणांना गुन्हयात निष्पन्न केले. तसेच कलीम मॅनेजर भोसले  (वय ४३) व रघवीर कलपत भोसले (वय २९ रा. हेंकळवाडी ता.धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याच्या ४ अंगठया, ब्रेसलेट, इअरींग व ४ मोबाईल एकुण ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करीत एकुण ९ आरोपी निष्पन्न करुन त्यापैकी दोघांना ताब्यात घेत लुटीचा गुन्हा उघडकीस आणला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, पोउनि. विजय पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. श्रीकृष्ण पारधी, पोहेकॉ. हेमंत बोरसे, मच्छिद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ व पोकॉ. नितिन धिवसे तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. कुणाल पानपाटील, उमेश पवार, पोकॉ. विशाल पाटील, कुणाल शिंगणे, सनी सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या