शिंदखेडा | प्रतिनिधी– तालुक्यातील अजंदे बुद्रुक येथील शेतकरी बंधुंनी गोमातेचे महत्व आपल्या कृतीतून सिद्ध केले. आपल्या पाच गायींची आई असलेल्या वृध्द गायीचे निधन झाल्याने त्यांनी गायीची हिंदू धर्म शास्त्रानुसार विधी करून गायीची अंत्ययात्रा काढली. प्रसंगी गल्लोगल्ली गोमातेचे पूजन करण्यात आले. या अंत्ययात्रेत संपूर्ण गाव गायीला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.
प्रगतशील शेतकरी दिनेश शरद पाटील व आकाश शरद पाटील हे दोघे बंधु शेती करून शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अजंदे पंचक्रोशीत त्यांनी दुग्ध व्यवसायामुळे आपले स्वतःचे नावही कमाविले आहे. त्यांच्याकडे पाच गायी व चार म्हशी आहेत. ज्या पाच गायी आहेत त्या घरच्या गायीच्याच वंशज आहेत. हिंदू धर्मात गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि त्याच्या प्रति असणारा जिव्हाळा आणि मातृत्वाचा आदर असणारी भावना हिंदू संस्कारात पिढ्यान पिढ्या चालत येते. या पाच गायींची आई वयोवृद्ध झाल्यामुळे नुकतेच तिचे निधन झाले. ती गाय पाटील परिवारातील एक सदस्यच होती. त्या गायीमुळे पाटील परिवाराची भरभराट झालेली होती. तिचे निधन झाल्यानंतर पाटील परिवाराने त्या गायीला टाकून न देता हिंदू धर्म शास्त्रानुसार विधी करून गायीची अंत्ययात्रा पार पाडली व गोमातेचे महत्व आपल्या कृतीतून सिद्ध केले. गोमातेच्या अंत्ययात्रा प्रसंगी गल्लोगल्ली गोमातेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण गाव गायीला अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले होते.
अंत्यसंस्कारावेळी मालकांनी स्वतःचे केस दिले. दशक्रियेच्या दिवशी गावकर्यांना भंडार्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. खेडोपाडी आजही सनातन धर्म टिकवला जात आहे, हे या दोन्ही बंधूंच्या कृतीतून सिद्ध झाले.