धुळे (प्रतिनिधी) : शिरपूर तालुका पोलिसांनी उमर्दा शिवारातील चार एकरा पेक्षा जास्त असलेल्या गांजा शेतीवर आज नांगर फिरवीला. या कारवाईत 53 लाखाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तसेच पिकाची मशागत करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमर्दा गावाजवळ रमेश लकड्या पावरा (वय 34 रा. उमर्दा ता. शिरपूर) हा बेकायदेशीररित्या गांजा पिकाची लागवड करुन देखभाल करीत असल्याची गोपनीय माहिती आज शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या परवानगीने सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवुन शेताचा शोध घेत छापा टाकत कारवाई केली. तेथे रमेश लकड्या पावरा हा गांजा पिकाची मशागत करतांना मिळून आला. तर लकड्या बेड्या पावरा याने गांजा पिक लागवड करण्यास मदत केली. या कारवाईत एकूण 53 लाख 10 हजार रुपये किमतीचे गांजा वनस्पतीची झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई मिलींद पवार हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई मिलींद पवार, ग्रे. पोसई- जयराज शिंदे, पोहेकॉ शेखर बागुल, पोकॉ राजु ढिसले, जयेश मोरे, भुषण पाटील, मनोज नेरकर, सुनिल पवार, स्वप्निल बांगर, रोहिदास पावरा, रंणजित वळवी, मनोज पाटील, सागर कासार यांच्या पथकाने केली. .