Wednesday, July 3, 2024
Homeधुळेचोरट्यांची टोळी जेरबंद, १५ दुचाकी, ६ जलपरी हस्तगत

चोरट्यांची टोळी जेरबंद, १५ दुचाकी, ६ जलपरी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

धुळे | प्रतिनिधी

- Advertisement -

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १५ दुचाकी, ६ जलपरी व एक बॅटरी असा सव्वा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि पाण्याच्या मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकाला खबर्‍यांमार्फत माहिती मिळाली की, साक्री तालुक्यातील कावठी येथील रहिवासी सुदाम ठाकरे व त्याच्या साथीदाराने अनेक दुचाकी व इले.मोटारींची चोरी केली आहे. त्यानुसार पथकाने कावठी येथून सुदाम सखाराम ठाकरे याच्यासह प्रमोद दगडू पिंपळे, रामदास तुकाराम पिंपळे, सतिष देवराम पिंपळे, दीपक सुरेश सोनवणे, प्रेमराव ज्ञानेश्‍वर शिंदे सर्व (रा. कावठी, ता.धुळे) व मोहम्मद ईरफान मोहमद आतीक (रा. मालेगाव, जि. नाशिक) याला मालेगाव येथून पकडण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी, एक बॅटरी, सहा जलपरी असा ४ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरीच्या घटना धुळे तालुका, सोनगीर, निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत घडल्या होत्या. या आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार, पोसई प्रकाश पाटील, आघाव, पोहेकॉ. हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण,प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, संजय सुरशे,राजीव गिते यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या