धुळे । प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारातील जंगलात खड्डा खोदून लपवलेला तब्बल 1010 किलो वजनाचा व सुमारे 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 1 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रोहिणी शिवारातील जंगलात गांजाचा साठा लपवण्यात आला असून, त्या ठिकाणी दोन जण रखवाली करत आहेत. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईची परवानगी घेतली. त्यानंतर पथकासह घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा दोन जण पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांची नावे भाईदास जगतसिंग पावरा (रा. लाकडया हनुमान) व बाटा अमरसिंग पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर) अशी सांगितली.
जंगलात शोध घेतल्यावर पळसाच्या झाडाजवळील ठिकाणी नवीन माती टाकलेली आढळली. संशय बळावल्याने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदण्यात आला असता, जमिनीखाली पत्रे लावून त्याखाली 34 पत्रटी कोठ्यांमध्ये गांजा भरलेला सापडला. प्रत्येक गोणीत 25 किलो गांजा भरलेला होता. तर एका गोणी 10 किलो गांजा होता. एकूण 1 हजार 10 किलो गांजा मिळून आला. ज्याची किंमत 7 हजार रुपये किलोप्रमाणे 70 लाख 70 हजार रुपये इतकी होते.याप्रकरणी पोहेकॉ. चत्तरसिंग खसावद यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयीतांवर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई. सुनिल वसावे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई. मिलींद पवार, पोहेकॉ. संतोष पाटील, सागर ठाकुर, संदीप ठाकरे, रमेश माळी, अल्ताफबेग मिर्झा, पोकॉ. धनराज गोपाळ, योगेश मोरे, संजय भोई, ग्यानसिंग पावरा, प्रकाश भिल, दिनकर पवार, वाला पुरोहित, रणजित वळवी, मनोज नेरकर, चालक पोकॉ. सागर कासार यांच्या पथकाने केली.