धुळे | प्रतिनिधी– पुण्याला जाणार्या संगीतम ट्रव्हल्समधून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसह प्रवास करणार्या पुणे व संगमनेरातील तिघांना मोहाडी पोलिसांची बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. तिघांविरूध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा-शिरपुर-धुळे मार्गे पुणे येथे जाणार्या एम.एच. १९ सीवाय ८६६६ क्रमांकाच्या संगीतम ट्रव्हल्समधून तीन प्रवासी गावठी कट्टयासह प्रवास करीत असल्याची खात्रीशीर माहिती काल दि.२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गस्तीवरील पोसई संदीप काळे यांच्यासह पथकाला कारवाईचे आदेश केले. त्यानुसार पथकाने लळींग टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्सला थांबविले. क्लिनरच्या मदतीने ट्रॅव्हल्समधील सिट नंबर २७, २८ व २९ वरील तिघा संशयीतांच्या अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्टल (गावठी कट्टा) व १० जिवंत काडतुस मिळून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिघांनी त्यांची नावे कुणाल बाळू गाडे (वय २२ रा. साकोरे, ता. आंबेगांव, जि. पुणे), महेश सिताराम देवकर (वय १९ रा. धोबी मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे) व दीपक राजू मोहिते (वय-२९ रा.आंबी खालसा, घारगांव, ता.संगमनेर, जि.अहिल्याबाई नगर) अशी सांगितली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, १० जिवंत काडतूस व मोबाईल असा एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोहेकॉं मंगल पवार यांच्या फिर्यादीवरून तिघांवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, २९ बी.एन.एस. ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास परि. पोसई नितीन करंडेे हे करीत आहेत.
दरम्यान आरोपी महेश देवकर याच्यावर पुणे जिल्हयातील नारायणगांव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे व दीपक मोहिते याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगांव पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १४३, १४७, १४८ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोसई संदीप काळे, परि. पोसई नितीन करंडे, पोकॉं चेतन झोलेकर, जयकुमार चौधरी, मयुर गुरव, वाहन चालक पोहेकॉ मंगल पवार यांच्या पथकाने केली.