धुळे | प्रतिनिधी- तालुक्यातील निमडाळे गाव शिवारातील दगडखानीत बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शालेय वनभोजनाच्या दिवशीच आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद झाली आहे.
हितेश विजय सुर्यवंशी-पाटील व मयूर वसंत खोंडे (वय १४) दोघे रा.निमडाळे अशी दोघा मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघे इयत्ता आठवी शिकत होते. धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा आज दि. २३ रोजी शालेय वनभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे गावापासून दोन ते तीन कि.मी अंतरावरील शिफाई धरण परिसरात करण्यात आले होते. त्याठिकाणी सर्व विद्यार्थी गेल्यानंतर अकरा वाजता दोघे विद्यार्थी हे दगड खानीतील पाण्यात पोहेण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान दोघे पोहतांना दगडाच्या खदानीत अडकल्याने पाण्यात बुडाले. काही जणांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात त्यानंतर हिरे रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत दोघांना मृत घोषित केले. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दगड खानीच्या पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
निमडाळेत शालेय वनभोजनाच्या दिवशीच घडली दुर्देवी घटना