धुळे । प्रतिनिधी- शहरासह जिल्ह्यातील दाट वस्तीतील छोट्या आगीवर नियंत्रण मिळविणे आता सोपे झाले आहे. कारण मनपासह शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागात प्रत्येकी दोन आपत्कालीन फायर बाईक दाखल झाल्या आहेत. त्याचे आज पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 6 फायर बाईकचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टिने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईकवर 200 लिटर पाण्याचे 2 टँक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे 200 लिटर लिक्विड फोमचे टँक असणार आहे. आज येथे वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाईकपैकी शिरपूर नगरपरिषदेला 2, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेला 2 तसेच धुळे महापालिकेस 2 फायर बाईक वितरीत करण्यात आल्या.