Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमदुर्गम भागातील गांजा शेती उद्ध्वस्त; ७६ लाखांची झाडे जप्त

दुर्गम भागातील गांजा शेती उद्ध्वस्त; ७६ लाखांची झाडे जप्त

दोन जण अटकेत; शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

धुळे | प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील बोरमळीपाडा गावाजवळील भोईटी शिवारातील वन जमिनीवरील गांजा शेती शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करीत उद्ध्वस्त केली. या कारवाईत एकुण ७६ लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तसेच गाजांची लागवड करीत पिकांची राखण करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनजमिनीवर गांजा या अंमली पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. त्याविरोधात गोपनिय माहिती काढुन अशा पिकांची लागवड करणार्‍या व त्याला प्रोत्साहन देणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानुसार माहिती काढत असतांना शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना काल दि. २८ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, बोरमळीपाडा गावाजवळ भोईटी शिवारात वनजमिनीवर संतोष ग्यानसिंग पावरा (रा. बोरमळीपाडा (भोईटी) पो. रोहीणी ता. शिरपूर) व रामप्रसाद हुरजी पावरा (रा. भोईटी ता. शिरपूर) यांनी गांजाची लागवड केली आहे. त्यावरुन निरीक्षक हिरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने कायदेशीर प्रक्रिया राबवुन त्या शेतावर छापा टाकला. तेथे गांजा पिकाची लागवड करुन राखण करतांना वरील दोघे मिळून आले. तसेच तेथून जवळच काही अंतरावर असलेल्या वनजमिनीवर भावसिंग काशिराम पावरा (रा. बोरमळीपाडा ता. शिरपूर) याने देखील गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे पथकाने पाहणी केली असता गांजाची शेती मिळुन आली. पोलिसांची चाहुल लागताच भावसिंग पावरा हा पळुन गेला. ही शेती देखील रामप्रसाद पावरा व संतोष पावरा यांनी संगनमताने केली असल्याचे चौकशीत समोर आले.

- Advertisement -

या दोन्ही कारवाईत ७६ लाख रुपये किंमतीची ३ हजार ८०० किलो गांजाची हिरवी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोहेकॉ सागर ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात वरील तिघांवर एनडीपीएस ऍक्टचे कायदा कलम ८ (क), २० (ब) आयआय (क) व २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई सुनिल वसावे हे करीत आहेत. दोघांना आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

YouTube video player
  • ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, पोकॉं सागर ठाकुर, पोहेकॉ खसावद, पोकॉ राजु ढिसले, पोहेकॉ संदिप ठाकरे, पोकॉ प्रकाश भिल, धनराज गोपाळ, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...