धुळे | प्रतिनिधी– साक्री तालुक्यातील लोणखेडी शिवारातील धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांची दुचाकी देखील धरणाच्या पाण्यात मिळून आली. दोघांचा दोन ते तीन दिवसांपासून शोध सुरू होता. याबाबत निजामपूर पोलिसात नोंद झाली आहे.
तुकाराम हिंमत शिंदे (वय ४० रा. खोरी ता. साक्री) व विक्की भालेराव पाटील (वय ३१ रा. पारोळा) अशी दोघा मृतांची नावे आहेत. दोघे दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुचाकीने खोरी गावाकडे निघाले होते. पंरतू ते खोरी येथे पोहचले नव्हते. म्हणुन कुटूंबियांनी तुकाराम शिंदे यांच्या सासरवाडीला फोन करुन विचारणा केली असता त्यांनी दोघे दोन दिवसांपुर्वीच निघाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटूंबियांनी नातेवाईकांकडे विचारपुस केली असता ते मिळाले नाही.
त्यानंतर मयताचा चुलत भाऊ व नातेवाईक दोघांचा शोध घेत दि.७ रोजी सकाळी ८ वाजता खोरी येथुन लामकानीकडे जात होते. तेव्हा लोणखेडी गाव शिवारातील धरणाजवळ दुर्गंधी येत असल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला जावुन पाहिले असता तुकाराम शिंदे व त्याचा चुलत शालक विक्की पाटील या दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसले. तसेच त्यांची दुचाकी देखील पाण्यात बुडालेली होती. दोघांसह दुचाकीला बाहेर काढण्यात आले. दुचाकीचा पुढील भाग फुटलेला तसेच तिची फेरींग तुटलेली दिसली. त्यामुळे अपघात होवून दोघे दुचाकीसह धरणात पडले असावे, असा कयास व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.आर. पाटील करीत आहेत.