धुळे (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने आज कारवाईचा चौकार मारला. एलसीबी व पिंपळनेर पोलिसांनी संयुक्तपणे साक्री तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातील शेतात छापा टाकत तब्बल 1 कोटी 19 लाखाचा गांजा जप्त केला. धुळे तालुका पोलिसांनी बॅटरी चोरट्याला जेरबंद केले. साक्री पोलिसांनी वृद्धाचे पाच लाख लांबविणाऱ्या मध्यप्रदेशातील दोघांना गजाआड केले. तर एलसीबीने शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट गावातील बनावट दारुच्या कारखाना उध्वस्त करीत साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
1 कोटी 19 लाखाचा गांजा जप्त- स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकत तब्बल 1 कोटी 19 लाखांचा गांजा व 6 लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गाव शिवारात ही कारवाई करण्यात आली.
पिंपळनेर येथील मोहन देवचंद साबळे हा त्याचे देशशिरवाडे शिवारातील शेतातुन गांजाची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार असल्याची गोपनीय माहिती काल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने संयुक्तीरित्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोहन साबळे याच्या शेतात छापा टाकला. तेथे पोपट ओंकार बागुल (वय 40 रा. रायकोट ता. साक्री ह.मु. मोहन साबळे यांचे देशशिरवाडे येथील शेतात) हा मिळुन आला. तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काळे प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने संशय आला. त्यांची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला. चौकशीत बागुल याने हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश्य मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. या कारवाईत एकुण 1 कोटी 19 लाख 23 हजार 920 रूपये किंमतीचा एकुण 18 प्लॅस्टिकचे गोण्यांमध्ये भरलेला 542.73 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ व 6 लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 1 कोटी 19 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोपट बागुल व मोहन साबळे यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि किरण बर्गे, एलसीबीचे पोउनि. प्रकाश पाटील, पोहेकॉ. संदिप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, पोकॉ. अतूल निकम, कमलेश सुर्यवंशी, राजीव गिते व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. कांतीलाल अहिरे, पोकॉ. दीपक पाटील, भरत बागुल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांच्या पथकाने केली.
चोरटा जेरबंद, वाहनांच्या 12 बॅटर्या हस्तगत- धुळे तालुक्यातील विंचूर शिवारासह विविध ठिकाणाहुन चारचाकी वाहनांची बॅटरी चोरी करणार्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील एकास जेरबंद केले असून त्याच्याकडून एकुण 12 बॅटर्या हस्तगत केल्या आहेत.
धुळे- चाळीसगाव रोडवरील विंचुर (ता. धुळे) गाव शिवारात रस्त्यावर पार्किंग केलेले काँक्रिट मिक्सर वाहनाच्या 18 हजाराच्या दोन बॅटर्या चोरट्याने लंपास केल्या. दि.12 ते 25 सप्टेंबरदरम्यान ही चोरी झाली. याबाबत जितेंद्र प्रसाद यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकाला गोपनिय माहिती काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून शकिल शेख सलिम शेख ऊर्फ शकिल सेंधवा (वय 38 रा. बाबानगर, नटराज टॉकिज समोर, एैंशी फुटी रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हयाची कबुली दिली. तसेच गुन्हयातील 18 हजारांच्या दोन बॅटरी काढून दिल्या. याबरोबरच तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्हयाची देखील त्याने कबुली देत गुन्हयात चोरलेल्या 15 हजारांच्या दोन बॅटर्या काढून दिल्या. दरम्यान आरोपी शकिल शेख सलिम शेख ऊर्फ शकिल सेंधवा याने त्याचे साथीदारांसह विविध ठिकाणांवरुन चारचाकी वाहनातून बॅटरी चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली. त्याच्याकडून एकुण 12 बॅटरी हस्तगत करण्यात आल्या. त्याने गुन्हा करतेवेळी वापरलेली कार व त्याचे साथीदारांबाबत माहिती दिल्याने वाहन व त्याच्या साथीदाराचा तपास सुरु केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व पोहवा किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, ललित खळगे, मनोज शिरसाठ, पोकाँ विशाल पाटील, धिरज सांगळे यांच्या पथकाने केली.
वृद्धाचे पाच लाख लांबविणारे दोघे गजाआड – साक्री तालुक्यातील कावठे गावातील ८० वर्षीय वृध्दाच्या हातातील पिशवी धारदार शस्त्राने कापून पिशवीतील ५ लाख रूपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. बाबुलाल नारायण गहिवडे (वय ८० रा.कावठे, ता.साक्री) हे दि.३ सप्टेंबर रोजी साक्री शहरातील युनियन बँकेत ५ लाख रूपयांचा भरणा करण्यासाठी गेले होते. तेव्हा बँक परिसरात त्यांच्या हातातील कापडी पिशवी चोरट्यांनी धारदार शस्त्राने कापून पिशवीतील रोकड हातोहात लंपास केली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असतांना साक्री शहरातील एसबीआय शाखेच्या व्यवस्थापकाने दोन संशयित बँक परिसरात फिरत असल्याची माहिती साक्री पोलिसांना दिली. त्यानुसार साक्री पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. कबीर बनवारीलाल सिसोदिया (वय-२२) व अर्जुन मुकेश सिसोदिया (वय २० रा. कडीया ता. पचोर जि. राजगड, मध्यप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांचे इतर दोन साथीदार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख व त्यांनी गुन्हयात वापरलेली दुचाकी असा एकुण ७० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पिंपळनेर पोलिसात दाखल गुन्हयाची देखील त्यांनी कबुली दिली. त्यांच्या साथीदारांचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोसइ विनोद पवार, संदीप संसारे पोहेकॉ उमेश चव्हाण, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, पोकॉ तुषार जाधव, रोहन वाघ, निखील काकडे यांच्या पथकाने केली.
बनावट दारुच्या कारखाना केला उद्ध्वस्त- शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट गाव शिवारात शेतातील घरात सुरू असलेला बनावट दारुच्या कारखाना छापा टाकत उद्ध्वस्त करण्यात आला. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत बनावट दारूसह दारू बनविण्याचे साहित्य व बोलेरो वाहन असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फत्तेपूर फॉरेस्ट गावात मोमल्या पावरा याचे शेतातील घरात त्याच्यासह संदेश पावरा (रा. मोयदा ता.शिरपूर) व त्याचे 4 ते 5 साथीदार हे टॅंगो पंच देशी दारु नावाची बनावट दारु तयार करीत होते. याप्रकरणी त्याच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोहेकॉ पवन गवळी, आरीफ पठाण, पोना महेंद्र सपकाळ, पोकॉ विनायक खैरनार व कैलास महाजन यांनी केली आहे.