धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, शिरपूर या पाचही विधानसभा मतदारसंघात मतदानाला आज दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. पाचही विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.79 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदानाच्या या उत्साहात ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्तीं, नवमतदार उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या, तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वत: धुळे शहरातील तु. ता. खलाने महाविद्यालय, देवपूर, एल. एम. सरदार हायस्कुल, गरुड हायस्कुल तसेच धुळे ग्रामीण मतदार संघातील एस. आर. पाटील महाविद्यालय, येथे भेट देवून मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बंदोबस्तावरील पोलीसांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. स्वत: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सातपुडा सभागृहातून वेबकास्टिंगच्या माध्यमामातून जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे- साक्री 6.46 टक्के, धुळे ग्रामीण-7.04 टक्के, धुळे शहर-5.43 टक्के, शिंदखेडा-6.13 टक्के, शिरपूर 8.90 टक्के याप्रमाणे सरासरी 6.79 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.