धुळे | प्रतिनिधी
येथील चिरायु ट्रेडर्स भागीदारी फर्ममध्ये अकाऊंटंटनेच अपहार केला. चेकवर खोट्या व बनावट स्वाक्षर्या करीत सेल्फ चेकव्दारे तब्बल ६१ लाख रूपये काढून घेत स्वतःसह कुटूंबासाठी वापरून घेतले. याप्रकरणी फर्मच्या अकाऊटंट विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत चिरायू अनुप अग्रवाल (वय २२ रा.प्लॉट नं. १८, अग्रवाल नगर, धुळे) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत चिरायु ट्रेडर्स भागीदारी फर्मच्या धुळे विकास सहकारी बँकेच्या गरुडबाग शाखेच्या चालु खात्यातून भागीदारी फर्मचा अकाऊटंट निलेश कचरूलाल अग्रवाल (रा.भाईजीनगर, धुळे) याने त्याचे ताब्यातील बँकेच्या फर्मचे खात्याच्या चेकबुकचा दुरूपयोग केला. या चेक्सवर त्याने फिर्यादीच्या खोट्या व बनावट स्वाक्षर्या करून सेल्फ चेकव्दारे एकूण ६१ लाख रूपये परस्पर काढून घेतले. तसेच ते स्वतः साठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी वापरून फिर्यादीची फसवणूक करीत भागीदारी फर्मच्या रक्कमेचा अपहार केला. त्यावरून निलेश अग्रवाल याच्याविरोधात भादंवि कलम ४२०, ४०८, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निलेश अग्रवाल यास अटक केली आहे. पुढील तपास सपोनि वर्षा पाटील करीत आहेत.