धुळे | प्रतिनिधी : शहरात गांजाची चोरटी विक्री करण्यासाठी आलेल्या बडवानीतील एकाला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन लाख ७४ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आज दि.२९ रोजी सकाळी कारवाई करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीवरून एकाला दोन पांढर्या रंगाच्या गोण्यासह पकडले. त्याने त्याचे नाव बबलु सखाराम खरते (वय ३३ रा. मालवण, तहसिल वरला जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याच्याकडील गोण्यांची तपासणी केली असता त्यात हिरवट पिवळसर अर्धवट सुकलेला पाने, बिया, काडया असलेल्या उग्र वासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला. एकुण २२ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २ लाख ७४ हजार ८०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी बबलु खरते याच्याविरुध्द पोहेकॉ सदेसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई प्रकाश पाटील, पोसई अमित माळी, असई संजय पाटील, पोहेकॉ संदीप सरग, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील, मायुस सोनवणे, तुषार सुर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील, अतुल निकम यांच्या पथकाने केली.