धुळे | प्रतिनिधी- शालेय विद्यार्थी सुरक्षिततेसाठी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज जिल्हाभरात विशेष मोहिम राबविली. त्यात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहनात बसवुन धोकेदायकपणे वाहतुक करणार्या तब्बल १७३ रिक्षा व व्हॅन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर शालेय परिसरात फिरणारे १३ टवाळखोर, ४८ पानटपरी चालकांवर देखील कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले. याबरोबरच इतर मोटार वाहन कायद्याप्रमाणे १३५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९८ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यात शहर वाहतुक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी शहरातील संतोषी माता चौक, कमलाबाई चौक, महाराणा प्रताप चौक, दत्त मंदिर चौक, जयहिंद चौक याठिकाणी विशेष मोहिम राबवत एकुण १०३ रिक्षा व व्हॅन चालकावर मोटर वाहन कायदा कलम १९४ प्रमाणे कारवाई करीत २५ हजार ४०० रूपयांचा दंड वसुल केला.
नियमांचे पालन करा, पालकांनीही काळजी घ्यावी-
विद्यार्थी वाहतुक करणारे रिक्षा व व्हॅन चालकांनी विद्यार्थांची वाहतुक करतांना वाहतुक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी वाहनात बसवावे. तसेच पालकांनी देखील आपले पाल्य ज्या रिक्षा / व्हॅन मधुन शाळेत जात आहेत ते रिक्षा चालक नियामानुसार वाहतुक करीत आहे? याबाबत खात्री करावी आणि आपले पाल्य शाळेत सुरक्षित कसे जातील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी केले आहे.