नंदुरबार | प्रतिनिधी
शहरातील माणिक चौकातील गोंधळी गल्लीत एका घरातून पोलीसांनी ४ लाख १८० रुपयांचा १९ किलो ९७४ ग्रॅम सुका गांजा जप्त केला. याबाबत एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास नंदुरबार शहरातील माणिक चौकातील जुनी गोंधळी गल्लीत हिरेन महेंद्र पवार हा त्याच्या घरात बेकायदेशिररित्या सुका गांजा बाळगून त्याची विक्री करतांना आढळून आला.
त्याच्याकडे १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा ५ किलो २८० ग्रॅम सुका गांजा, १ लाख १ हजार २०० रुपये किंमतीचा ५ किलो ६० ग्रॅम सुका गांजा, ३२ हजार रुपये किंमतीचा १ किलो ६०० ग्रॅम सुका गांजा, ३६ हजार ८४० रुपये किंमतीचा १ किलो ८४२ ग्रॅम सुका गांजा, ४३ हजार ७२० रुपये किंमतीचा २ किलो १८६ ग्रॅम सुका गांजा,
१७ हजार ६८० रुपये किंमतीचा ८८४ ग्रॅम सुका गांजा, २१ हजार ४४० रुपये किंमतीचा १ किलो ७२ ग्रॅम सुका गांजा, ४१ हजार रुपये किंमतीचा २ किलो ५० ग्रॅम सुका गांजा, ७० रुपयांची ऍल्युमिनीयम धातुची तगारी असा एकुण ४ लाख १८० रुपयांचा १९ किलो ९७४ ग्रॅम सुका गांजा आढळून आला.
याबाबत हवालदार विनोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करीत आहेत.