निजामपूर । (वार्ताहर) : साक्री तालुक्यातील जैताणे येथे प्रेयसीसोबत गप्पा मारणार्या आदिवासी भिल समाजाच्या तरूणास बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल असून पोलिसांनी तीन जणांना अटकही केलेली आहे. दरम्यान या घटनेचा निषेधार्त आज आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्यावर टायरची जाळपोळ करीत रास्तोरोको आंदोलन केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला. व्यावसायकांनी आपली दुकाने, व्यवहार बंद केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, निजामपूर पोलिस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे, पोसई प्रदिप सोनवणे यांच्यासह कर्मचार्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
अजय राजेंद्र भवरे (वय 20 रा. भिलाटी, वासखेडी रोड, जैताणे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दि. 18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्याची प्रेयसी सोबत परिसरात गप्पा मारीत होता. त्यादरम्यान गावातील विरोबा देवाचे मंदिराच्या बाजूला असलेल्या घरामध्ये राहणारे तुकाराम बाळू शिंदे, वैभय तुकाराम शिंदे, रावसाहेब बाळु शिंदे, रविंद्र चैत्राम धनगर या चौघांनी अजय भवरे यास त्याचे नाव गाव विचारुन तो आदिवासी भिल्ल समाजाचा आहे, म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. हाताबुक्यांनी व लाकडी काठीने हातापायांवर व डोक्यावर जबर मारहाण करुन त्यास गंभीर जखमी केले. उपचार सुरु असतांना अजय याचा काल दि.20 रोजी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र दगडु भवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर काल रात्रीच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तुकाराम शिंदे, रावसाहेब शिंदे व रविंद्र धनगर या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्त आज सकाळी तरूणाच्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत टायर जाळून रास्तोरोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती पाहुन व्यावसायीकांनी देखील आपले व्यवहार बंद केले. रास्तारोकोनंतर आंदोलनकांनी निजामापूर पोलिस ठाणे गाठत आरोपींना आमच्या समोर उभे करा, अशी मागणी लावून धरली. यावेळी पोलिस अधिकार्यांनी आंदोलकांना तरूणाच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेवून नये, शांतता ठेवावी, असे आवाहन केले.