वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठूराया आणि रूक्मिणी! विठ्ठलास पांडुरंग परमात्मा या नावानेही ओळखले जाते. वारकरी संप्रदायासाठी तर ही साक्षात विठूमाऊलीच आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी! आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकर्यांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे!
वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी! त्यामुळे आषाढ महिना सुरू झाला की, समस्त वारकर्यांना वेध लागतात ते विश्वास आणि धार्मिक ऐक्याची सांगड घालणार्या आषाढी वारीचे!
‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी’… या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा लाभला आहे. वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदाय नावानेही ओळखला जातो. जातीभेदविरहीत मानवतेच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करणार्या या संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. संतांनी वेगवेगळ्या कालावधीत जन्म घेऊन तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीत लोकांना लाखमोलाचे प्रबोधन केले. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठूराया आणि रूक्मिणी! विठ्ठलास पांडुरंग परमात्मा या नावानेही ओळखले जाते. वारकरी संप्रदायासाठी तर ही साक्षात विठूमाऊलीच आहे.
वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी! आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकर्यांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे!आषाढ शुद्ध-11! या दिवशी येणार्या आषाढी एकादशीला देवशयनी किंवा शयनी एकादशी म्हटले जाते. कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुध्द एकादशीस ते शयनातून जागे होतात, असे सांगितले जाते. त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखले जाते.
वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीस पायी चालत पंढरीस लाडक्या विठूरायाच्या दर्शनास जातात. आषाढी एकादशीस पायी चालत पंढरपूरास जाण्याच्या प्रथेला ‘वारी’ असे म्हणतात. ही वारी करणारे ते वारकरी! वारकरी पंथ ही इसवी सन 1290 पूर्वीपासून व त्याअगोदरही मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता, असे काही धार्मिक ग्रंथ सांगतात. वारकरी पंथात जी संतपंरपरा आहे त्यातील अनेक विठ्ठलभक्त संतांची पालखी त्यांच्या मूळस्थानावरून पंढरपूरास नेण्याची परंपरा आहे. फार वर्षांपूर्वी हैबतीबाबा नावाचे महान विभूती होऊन गेले. जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे निष्ठावान भक्त होते. त्यांचे मूळ गाव सातार्याजवळील आरफळ होते. पुढे ते आळंदीत स्थायिक झाले. त्यांनी संत ज्ञानोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून त्या पंढरपूरापर्यत भजने गात मिरवत नेल्या. तेव्हापासून ही परंपरा नेमाने सुरू झाली.
तुळशी माळ गळा! गोपीचंदन टिळा !!
हृदयी कळवळा वैष्णवांचा!!
वारकरी हा श्रद्धाळू भाविक-भक्त आहे. कसलाही भेदभाव न करता ते विठूरायाची मोठ्या भक्तीभावाने सेवा करतात. श्रध्दा हेच कारण त्यातून समोर येते. संत तुकोबारायांनी एका अभंगाचा दाखला दाखवला आहे.
आम्हा अळंकार मुद्रांचे शृंगार।
तुळसीचे हार वाही कंठी ॥1॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे।
निरतंर वाचे नामघोष॥ध्रु.॥
आम्हां आणिकांची चाड चित्ती नाही।
सर्व सुख पायी विठोबाच्या॥2॥
तुका म्हणे आम्ही नेघोंचि या मुक्ती।
एकाविण चित्ती दुजे नाही ॥3॥
वारकरी बांधवांमध्ये विश्वास आणि श्रध्दा मोठ्या प्रमाणावर का असते याचे कारण तुकोबाराय देतात.
काही न लगे एक भावची कारण!
तुका म्हणे आण विठोबांची!!
तुकोबारायांनी शपथ घेऊन सांगितले आहे की, माझा पांडुरंग वारकर्यांमधील भाव, भक्ती, श्रध्दा आणि विश्वास आदींचे उदाहरण आहे. जगातील पहिले वारकरी कोण? असे कोणी विचारले तर उपनिषदे, धर्मशास्त्र, संत वाड.्मय असे सांगते की, जगातील पहिले वारकरी हे भगवान शंकर होत. संत नामदेव महाराजांनी याविषयी एक कोडेरुपी अभंग लिहिला आहे.
अकरा लोचन त्याचे पाच मुख।
आठ कान देख पुच्छ दोन॥
अरत अखंड निरत प्रचंड।
उमाळ उदंड उभा फार॥
दहा पाय चहू चालत ते जाय।
नव्हेत ग माय सावज त्या॥
नामा म्हणे त्याचा अर्थ करी चोख
पूर्वज पातक लया जाय॥
याचा अर्थ भगवान शंकरांचे तीन डोळे, पार्वतीमातेचे दोन डोळे, गणेशाचे दोन डोळे, नंदीचे दोन डोळे व सापाचे दोन डोळे असे एकूण अकरा डोळे! या पाच जणांची पाच मुखे. सापाला कान नसतात. त्यामुळे नामदेवरायांनी फक्त आठ कान सांगितले आहेत. नंदीची एक शेपूट व सापांची एक शेपूट म्हणजे दोन शेपट्या आहेत. भगवान शंकराचे दोन पाय, पार्वतीमातेचे दोन पाय,गणेशाचे दोन पाय आणि नंदीचे चार पाय. सापाला पाय नसतात. त्यामुळे दहा पाय झाले. दहा पाय असूनही ते वारी करताना चार पायाने वारी करतात. म्हणजे सर्व जण नंदीवर बसून म्हणजे नंदीच्या चार पायांनी वारी करतात. म्हणून पहिली वारी भगवान शंकरांनी केली, अशी समस्त वारकरी बांधवाची श्रध्दा आहे.
– बंडू खडांगळे, लखमापूर