धुळे | (प्रतिनिधी) : धुळे- अमळनेर रस्त्यावर तालुक्यातील फागणे गावाच्या पुढे काल भरदिवसा लुटमारीची घटना घडली. दोन अनोळखींनी धरणगावच्या व्यावसायीच्या दुचाकीला लाथ मारली. त्यानंतर त्यांच्या डिक्कीतील सुमारे ११ लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली. यात व्यावसायीकासह दोघे जखमी झाले असून याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पी.एस.नगरात राहणारे किशोर पंढरीनाथ पाटील हे काल दि. १८ जुलै रोजी दुपारी सहकारी अतूल लक्ष्मीनारायण काबरा यांच्यासह किशोर लक्ष्मीनारायण काबरा यांनी दिसान ऍग्रो प्रा. लि. यांना विक्री केलेले सोयाबी मालाने पेमेंट १० लाख ९१ हजार ९०० रूपये हे एमएच १९ बीई १८०७ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून जात होते. त्यादरम्यान पावणे पाच वाजेच्या सुमारास धुळे-अमळनेर रस्त्यावरील अमळनेरकडे जाणार्या रस्त्यावर फागणे गावाच्या पुढे तीन कि.मी अंतरावर अचानक आलेल्या दोन अनोळखी इसमांनी दोघांना घाबरविले. तसेच त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. त्यात दोघे जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील वरील रोकड जबरीने हिसकावून नेली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.