Saturday, November 23, 2024
Homeजळगावमराठी साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज उपेक्षितच

मराठी साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज उपेक्षितच

शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांची खंत

जळगाव- । वास्तविक छत्रपती शिवरायांच्या जीवनावर मराठी भाषेत अनेक चरित्रे, नाटके, कादंबर्‍या, कथा, प्रवासवर्णने, काव्य, पोवाडे, संशोधनपर साहित्य, बखरी असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण झाले पण दुर्दैवाने आजवर झालेल्या ९६ मराठी साहित्य संमेलनामध्ये एकाही संमेलनात महाराजांवरील साहित्यावर एखादा स्वतंत्र परिसंवाद, विवेचन, चर्चा झाली असे दिसत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. जिथे प्रत्यक्ष शिवचरित्र घडले त्या महाराष्ट्रातच अशा संमेलनांनी महाराजांच्या कार्याची उपेक्षा करायची हे काहीसे क्लेशदायक वाटते .आपणच जर कुठल्याही कारणाने अशी उपेक्षा करणार असू तर विश्व पातळीवर हे शिवचरित्र कसे पोहोचेल याचा सर्वांनी विचार करावा असे आवाहन संमेलनाध्यक्ष विजयराव देशमुख यांनी केले.
जळगाव शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन तंजावरचे श्रीमंत शिवाजी राजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. या याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, उद्योजक अशोकभाऊ जैन, संमेलनाध्यक्ष विजयराव देशमुख (नागपूर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, कार्याध्यक्षा केतकी पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार आजही प्रेरणादायी आहेत. ते पुढच्या पिढीसाठी नक्कीच कामी येतील अशी सुर उपस्थित मान्यवरांकडून निघाला.. सार्ध त्रिशती श्री शिवराजाभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र व नुतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत शिवाजीराजे भोसले तंजावर, स्वागताध्यक्ष आ. राजूमामा भोळे, स्वागत सचिव किरण बच्छाव, कार्याध्यक्ष डॉ. केतकी पाटील आयोजक प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव देशमुख, डॉ. रवींद्र पाटील, भारती साठे, शंकर जाधव, प्राध्यापक डॉक्टर मधुकर साठे, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्रसिंह देवरे, यांनी पहिल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनासाठी संमेलन अध्यक्षपद देऊन माझ्या शिवकार्याचा आपण जो सन्मान केला त्याबद्दल आभारी असल्याचे विजयराव देशमुख यांनी सांगितले
महाराजांचा लौकीक व आत्मीक जीवन पवित्र
विजयराव देशमुख पुढे म्हणाले की , शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे किंवा देशाचे नव्हे तर सार्‍या विश्वातील एक आदर्श महापुरुष आहेत. शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, सिझर, नेपोलियन, शार्लमान, क्रॉमबेल, वॉशिंग्टन इ. लोकोत्तर वीरांशी केली जाते पण चारित्र्य, ध्येयनिष्ठा, नीतिमत्ता, शौर्य, दूरदृष्टी, प्रतिभा डोळस आणि आदर्श राजनीती, कर्तृत्व आणि युगानुकूल महत्त्व इ. गुणविशेषांचे अनसेयू वृत्तीतून चिंतन केले तर महाराज या सर्वांपेक्षा नक्कीच सरस ठरतात. महाराजांची योग्यता स्वयंसिद्ध आहे. कै. राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे, अलेक्झांडर प्रमाणे महाराजांनी आपल्या स्नेह्यासोबत्यांना ठार मारले नाही. सिझर प्रमाणे आपल्या पत्नीस सोडून दिले नाही. नेपोलियन बोनापार्टने डफ डांगियांचा जसा अन्यायाने वध केला तसा महाराजांनी कोणाचाही केला नाही. क्रॉमवेलने निरपराध आयरिश लोकांची जशी भीषण कत्तल केली तशी महाराजांनी संपूर्ण देशात कुठेही कत्तल केली नाही. महाराजांचे लौकिक व आत्मिक जीवन निष्कलंक व पवित्र होते. महाराजांचा संघर्ष कुणा जातीशी व धर्माशी नव्हता तर त्यांचे कार्य प्रकृती विरुद्ध विकृतीच्या संघर्षात प्रकृतीच्या पुनःस्थापनेसाठी होते. एकीकडे ठार मारण्याच्या निर्धाराने आलेल्या अफजलखानाला भेटीत महाराजांनी त्याने पहिला हल्ला केल्यानंतर, क्षत्रिय धर्मन्यायानुसार त्याचा वध केला तर दुसरीकडे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला (तो अफजलखान प्रसंगावरून पूर्ण घाबरून गेल्याने) निर्भयतेचे वचन देऊन प्रेमालिंगन दिले. यवनांशी संघर्ष करीत असताना स्वकियांशी त्यांना संघर्ष करावा लागला तो त्यांनी कठोरपणे केल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या