धुळे | प्रतिनिधी- माणुसकीच्या नात्याने मदत करणे एका शेतकर्याला चांगलीच डोकेदुखी ठरली. त्यांनी मित्राकडून कामासाठी घेतलेली दुचाकी लिफ्ट घेणार्यानेच पळवून नेली. दरम्यान दुचाकी लांबविणार्या त्या अज्ञात चोरट्याला मोहाडी पोलिसांनी ४८ तासांच्या आतच जेरबंद केले. त्यांच्याकडून ५० हजारांची दुचाकी हस्तगत करीत शेतकर्याला दिलासा दिला.
धुळे तालुक्यातील नवलाणे येथील शांतीलाल दयाराम बागुल (वय ४९) यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांचे काही खाजगी कामानिमित्त मित्र बाबुलाल पांडु कोळपे यांच्याकडून त्यांच्या मालकीची एम.एच.१८/सी.बी. ७१२९ क्रमांकाची दुचाकी घेतली. तिच्याने ते धुळे शहरात आले होते. कामकाज उरकून श्री.बागुल हे घरी जात असतांना चाळीसगांव चौफुली येथील एच.पी. पेट्रोल पंप जवळ एक अनोळखी इसमाने त्यांना रस्त्यात थांबवून मला पुढील रस्त्यापर्यंत सोडून द्या, अशी विनंती केली. श्री.बागुल यांनी माणुसकीच्या नात्याने इसमास दुचाकीवर बसविले. पुढे गेल्यावर श्री. बागुल यांना अचानक नैसर्गिक विधी लागल्याने त्यांनी दुचाकी ही हॉटेल ५५५५५ च्या सव्हिस रोडलगत थांबविली. चावी दुचाकीलाच राहिली. दरम्यान दुचाकीस्वार श्री. बागुल हे नैसर्गिक विधी करीत असतांना त्यांचे सोबत चाळीसगांव चौफुली येथून बसलेल्या इसमाने दुचाकी चोरून नेली. त्यानंतर श्री.बागुल यांच्यासह त्यांच्या मित्राने पाच ते सहा दिवस दुचाकीचा परिसरात शोध घेतला. परंतु दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसर गुन्हा दाखल करण्यांत आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी गोपनिय माहितीच्या आधारे सचिन तुकाराम मिस्तरी (वय २९ रा. मोहाडी उपनगर) याला जेरबंद केले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गुन्हयातील चोरलेली दुचाकी काढून दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एसडीपीओ विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत.