धुळे (प्रतिनिधी) : जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी, याकरीता सर्व ग्रामपंचायती, खाजगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड कार्यक्रम 2024 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज सकाळी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोयल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो ) नितीनकुमार मुंडावरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गिते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोयल म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी धुळे जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी गाव तेथे मियावाकी, ग्रामपंचायत, गायरान जमीन, पडीक जमीन, सरकारी शाळा, स्मशानभूमी, खाजगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत मियावाकी पद्धतीने रोपवाटिका तयार करावी. या मियावाकी पद्धतीने वृक्षाची लागवड केल्यास कमी जागेत जास्त झाडांची लागवड होते. या पद्धतीचा वापर करुन 10 मीटर बाय 10 मीटर जागेमध्ये जवळपास विविध प्रजातीच्या 300 झाडाची लागवड करु शकतो. यात मोठ्या, मध्यम व सब ट्री प्रकारचे वृक्ष लागवड करता येते. या पद्धतीने वृक्षाची लागवड केल्यास झाडांची कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीसाठी बिहार पॅटर्न, अकोला पॅटर्न, कन्या वन समृद्धी योजनाच्या माध्यमातून वृक्षारोपन करुन मोठ्या प्रमाणात प्रत्येक नागरिकांने तसेच विविध विभागांनी वृक्ष लागवड करुन या मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गिते यांनी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड कशी करावी याबाबत उपस्थितांना प्रात्याक्षिक दिले.
अशी आहे मियावाकी पद्धत
जपानी शास्त्रज्ञ मियावाकी यांनी ही पद्धती विकसित केली असून या मियावाकी पद्धतीने सर्वसाधारणपणे 1000 चौ.फूट जागेत 250 मोठे, मध्यम व लहान वृक्षांची लागवड करतो येते. यात उंच वाढणारे, मध्यम, मध्यम वाढणारे वृक्षांचा समावेश असतो. या पद्धतीने वृक्षलागवड केल्यास वृक्षांमध्ये सूर्यप्रकाश, वारा व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होवून त्यांची 10 पट वाढ जोमात होते. तसेच 2 वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. यामुळे साधारणत: तीन वर्षांत घनदाट जंगल तयार होऊन जंगलात विविध पक्षी आपले आश्रयस्थान निर्माण करतात. तसेच निसर्गाचा समतोल राहण्यास मदत होते.