Friday, October 18, 2024
Homeनंदुरबारमुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्हा जलमय, नवापूर तालुक्यात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे...

मुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्हा जलमय, नवापूर तालुक्यात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

नंदुरबार/नवापूर | प्रतिनिधी/श.प्र. –

नंदुरबार शहरासह जिल्हयात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील नदीनाल्यांना पूर आला आहे. त्यातच गुजरात राज्यातील डांग जिल्हयात झालेल्या जोरदार पावसामुळे नवापूर तालुक्यातील रंगावली, सरपणी नद्यांना पूर आहे. í

- Advertisement -

दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नवापूर तालुक्यातील कोळदा ते चिंचपाडा दरम्यान असलेला रेल्वेमार्ग पूर्णतः पाण्याखाली आल्यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच चिंचपाडयाजवळ मातीचा भराव वाहून आल्यामुळे मातीमध्ये मालगाडी फसली आहे.

त्यामुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. एकुणच जिल्हयात काल मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नंदुरबार शहरासह जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, काल मध्यरात्रीपासून जिल्हयात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे जिल्हयातील बहुतांश नदीनाल्यांना पूर आले आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्हा जलमय झाला आहे.


नवापूर
नवापूर शहरासह तालुक्यात काल मध्यरात्रीपासून धो धो पाऊस सुरु आहे. या पावसामुळे संपुर्ण नवापूर तालुका जलमय झाला आहे. डांग जिल्हयात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रंगावली आणि सरपणी नद्यांना पूर आले आहे. संततधार पावसामुळे शहरातील प्रभाकर कॉलनी इस्लामपुरा भाग पूर्णतः पाण्यात आल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्र भर पावसाने अक्षरशः झोडपल्यामुळे शहराच्या चोहो बाजूला पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.


महामार्गापलीकडील नगर परिषद हद्दीतील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, देवळफळी भागातील घरे पाण्यात बुडाली होती. स्थानिक युवकांच्या सहकार्याने नागरिकांना रात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास रेस्न्यू करण्यात आले होते.

प्रभाकर कॉलनी आणि इस्लामपुरा भागात नेहमीच पावसाळ्यात पाणी भरत असल्याचे प्रशांसनास माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही परिस्थिती उद्भभवली असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले असून राष्ट्रीय महामार्गाचे संथ गतीने होत असलेले व नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

नगर परिषद प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत. स्थानिक माजी नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहरावर आज पावसाच्या पाण्याचे संकट ओढवले असल्याचे बोलले जात आहे.

नवापूर शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाल्याकिनारी राहणार्‍या नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरीकांनी रस्त्यावर येऊन रात्र काढली. शहरात ठिकठिकाणी पाणी शिरल्याने वीज मंडळाने शहराचा विज प्रवाह बंद केला आहे. शहरालगत असलेल्या रंगावली नदीलाही पूर आला आहे.

यामुळे नदीकाठावर राहणार्‍या नागरीकांना नगरपालिका प्रशासनाने सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. नॅशनल हायवे ६ वर पावसामुळे प्रचंड प्रमाणात ट्रकांची मोठी लाईन लागली आहे. ज्या भागात पाणी शिरले आहे, त्या ठिकाणी नवापूर तालुक्याचे आ.शिरीषकुमार नाईक यांनी भेट देऊन मदत कार्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रभारी तहसिलदार सुरेखा जगताप, मुख्यधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, प्रभारी पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक मनोज पाटील, भाजपचे एजाज शेख, माजी नगरसेवक आरीफ बलेसरीया, फारुक शहा आदी उपस्थित होते. शहरातील करंजी ओवारा भागातही नॅशनल हायवेच्या हलगर्जीपणामुळे घरात पाणी शिरले आहे.

रेल्वे वाहतूक थांबवली

दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे कोळदा-चिंचपाडा रेल्वेमार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे पट्टयांवर माती, चिखल वाहून आल्यामुळे चिंचपाडा स्टेशनवर थांबवण्यात आलेली मालगाडी या माती व चिखलात रुतली आहे. जोपर्यंत चिखल माती या रेल्वेतून काढली जात नाही तोपर्यंत सदर रेल्वे पुढे नेणे अशक्य असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पावसाचा रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या