धुळे | प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्या भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे यंदा सुमारे २३५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातूनच एसटी बस उपलब्ध करून देण्याचेही नियोजन रा.प.महामंडळातर्फे करण्यात आले आहे. तर यात्रा कालावधीदरम्यान धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या आगारातून ठराविक वेळेला दररोज एकुण १८ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
पंढरपूर येथे दि.१३ ते २१ जुलै दरम्यान आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. यापार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे भाविकांच्या सोयीसाठी २३५ जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दररोज धावणार १८ बसेस- यात्रा कालावधीत विभागातील धुळे आगारातून- सकाळी ०६:००, ०७:००, ०९:०० दुपारी ०३:००, ०४:५०, सायंकाळी ०५:०० व ०७:०० वा., साक्री आगारातून सकाळी ०९:३० वा., नंदुरबार आगार – दुपारी ०३:३०, ०४:०० व सायंकाळी ०५:०० वा., शहादा आगार येथून सकाळी ०९:३० वा., शिरपूर आगारातून सकाळी ०७:००, ०८:०० व दुपारी ०२:३० वा., शिंदखेडा आगार सकाळी ०८:३० वा. तर दोंडाईचा आगारातून सकाळी ०८:०० व ०९:३० वाजता बसेस सोडण्यात येतील.
गावातून सुटणार बस- ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. त्यामुळे ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांची बससाठी मागणी आल्यास थेट त्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रा.प.महामंडळाच्या सवलती लागू- आषाढी यात्रेनिमित्त जाणार्या भाविकांना अमृत ज्येष्ठ, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सन्मान योजनेनुसार प्रवास भाड्यात सवलत मिळणार असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी रा.प. बसेसनेच प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
३० बसेसची नोंदणी– आषाढी यात्रेनिमित्त भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांकरीता यावर्षी सुमारे २३५ जादा बसेस विभागातून सोडण्यात येतील. तर ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी बसची मागणी केल्यास थेट त्या गावातून पंढरपूर येण्या- जाण्यासाठी व परतीसाठी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंत ३० बसेसची नोंदणी झाली आहे. -सौरभ देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी