दिग्दर्शक शिवाजी पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जळगाव दि.२३ (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सव उद्या गुरुवार दि. २४ ऑक्टोबर पासून विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू होत आहे. उद्या उद्घाटन होणार असून प्रत्यक्ष कलाप्रकारांच्या स्पर्धा शुक्रवार पासुन सुरू होणार आहेत.
यावर्षी युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सव एकत्रित घेण्यात येत आहे. सोमवार दि. २८ ऑक्टोबर पर्यंत हा महोत्सव आहे. गुरुवारी संध्याकाळी ४.३० वाजता सुप्रसिध्द मराठी चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या हस्ते पदवीप्रदान सभागृहात उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी प्र-कुलगुरू एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती असणार आहे. या महोत्सवात १४०९ विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ८०५ विद्यार्थिनी आणि ६०४ विद्यार्थी आहेत. धुळे जिल्ह्यातील २१८ विद्यार्थिनी, १४४ विद्यार्थी, जळगाव जिल्ह्यातील ४१० विद्यार्थिनी ३३३ विद्यार्थी आणि नंदुरबार जिल्ह्यातील १७७ विद्यार्थिनी आणि १२७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय ११७ पुरुष संघ व्यवस्थापक आणि ११६ महिला संघ व्यवस्थापक देखील येणार आहेत. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी बुधवारी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला व प्रत्यक्ष स्पर्धा स्थळी भेट दिली. मुलांच्या वसतिगृहात स्पर्धक विद्यार्थ्यांची आणि मुलींच्या वसतिगृहात स्पर्धक विद्यार्थिनींची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक भवनाच्या प्रांगणात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष स्पर्धेला उद्यापासून सुरूवात
प्रत्यक्ष स्पर्धेला शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी प्रारंभ हाईल. या दिवशी रंगमंच क्र.१ वर सकाळी ८.३० वाजता मिमिक्री, दुपारी १ वाजता मुक अभिनय, रंगमंच क्र.२ वर सकाळपासून वक्तृत्व, रंगमंच क्र.३ वर सकाळी ८.३० पासूनि भारतीय समुह गान, रंगमंच क्र.४ वर सकाळी ८.३० वाजता स्वरवाद्य, दुपारी १ वाजता तालवाद्य, सायंकाळी ४ वाजता शास्त्रीय गायन या स्पर्धा होतील तर रंगमंच क्रमांक ५ वर सकाळी ८.३० वाजता, स्पॉट पेंटीग, दुपारी १ वाजता व्यंगचित्र आणि सायंकाळी ४ वाजता चिकटकला हे कला प्रकार सादर होतील.