जकात नाक्याजवळील घटना ; महामार्ग ठरतोय जीवघेणा
जळगाव- शहरापासून काही अंतरावर असलेल्या जकात नाकाजवळ भरधाव वेगाने जाणार्या कॉंक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दुसरा तरूण जखमी झाला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी करत एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कुणाल राजेंद्र महाले वय-२५, रा. नाहाटा नगर, भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गेल्या महिन्यात जळगाव शहरातून जाणार्या महामार्गावर ट्रकने एक विवाहिता आणि मुलीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात जनसामान्यांतून तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेला महिना होत नाही तोच बुधवारी दि. २५ रोजी जळगाव-भुसावळ महामार्गावर पुन्हा एका तरूणाला कॉंक्रीटच्या मिक्सर वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील नहाटा नगरात कुणाल महाले हा तरुण आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. कुणाल हा नुकताच तीन महिन्यापूर्वीच भुसावळ शहरातील के.नारखेडे महाविद्यालयात क्लर्क म्हणून नोकरीला लागला होता. दरम्यान महाविद्यालयाच्या कामकाजानिमित्त कुणाल महाले आणि त्याचे सहकारी निखिल शरद बर्हाटे हे दोघेजण भुसावळवरून विद्यापीठात जाण्यासाठी जळगाव शहरातून जात होते. त्यावेळी जळगाव शहराच्या पुढे असलेल्या जकात नाका जवळून जात असताना मागून भरधाव वेगाने येणारे कॉंक्रीट मिक्सरने त्यांच्या दुचाकीला कट मारला या अपघातात कुणाल महाले हा रस्त्यावर पडल्याने मागून येणार्या कॉंक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यात कुणालाचा जागीच मृत्यू झाला तर निखिल बर्हाटे हा किरकोळ जखमी झाला आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
दरम्यान ही घटना घडल्यानंतर नातेवाईक व महाविद्यालयातील सहकारी यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान घरातील कमवता मुलगा गेल्याने रूग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. कुणालच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ आहेत. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
महामार्गावरील खड्डे बुजणार कधी?
महामार्गावर दुचाकीस्वारांना चिरडल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला त्याचे कुठलेही सोयरे-सुतक नाही. महामार्गावरील खड्ड्यांविरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्याचाही परिणाम प्रशासनावर झाला नाही. जिल्हा प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहत आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.