नंदुरबार | दि.२९| प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणेमार्फत शहादा येथे घेण्यात येणार्या मराठी संगणक टंकलेखन परीक्षेत १५ डमी विद्यार्थी बसवून तोतयेगिरी करणार्या ३२ जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ जून रोजी सकाळी ११.२६ च्या सुमारास शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी संगणक टंकलेखनाची परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेत महिंद्र भिका मोरे, गणेश उखा न्हावी यांनी प्रियेश महेंद्र शिरसाठ, संगिता भगवान सोनवणे, अजय भागवत सुरवसे, रितेश गोटुलाल तायडे, अतुल हेमंत ठाकरे, दिपीका राजकुमार ठाकरे, ईश्वरी वसंत ठाकरे, लियांडर भिमसिंग ठाकरे, राकेश जहांगीर ठाकरे, सावन इंद्रसिंग ठाकरे, विष्णु वसंत ठाकरे, योगीराज राजकुमार ठाकरे, मुन्नी वण्या वळवी, वैशाली गेमा वळवी, हर्षल विनोद वळवी यांच्या जागी मराठी संगणक टंकलेखन परिक्षा चालू असतांना परिक्षेत अज्ञात १५ डमी परिक्षाथीना बसवून घेवुन तोतयेगिरी केली.
याबाबत शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी योगेश मोतीराम सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १७ परिक्षार्थींसह १५ डमी परीक्षार्थींविरुद्ध २०२४ भादंवि कलम ४१६, ४१९ सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनीर्दिष्ठ परिक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चे कलम ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.